Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. महाअंतिम सोहळा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली ती म्हणजे यंदा हा शो कोणी जिंकलाय? तन्वी कोलते, राकेश बापट अनुश्री माने, विशाल कोटीयन आणि दिपाली सय्यद हे यंदाचे टॉप-५ स्पर्धक आहे. आता या पाच जणांमध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.
मात्र, या शोच्या ग्रँड फिनालेचे प्रोमो प्रसारित करण्यात आल्याने शूटिंग आधीच झालंय असं प्रेक्षकांना वाटतंय. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन कोण जिकलंय हे जाणून घेण्यासाठी सगळेजण आतुर आहेत. ग्रँड फिनालेला जे-जे स्पर्धक उपस्थित होते, त्यांच्याकडे शो नेमकं कोण जिंकलंय याबद्दल विचारणा केली जात आहे.
आयुष संजीव व ओमकार हे दोघंही यावर्षी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहभागी झाले होते. समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना या दोघांची झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांनाही मेसेज करून बिग बॉस प्रेमी नेमकं कोण जिंकलंय याबद्दल विचारपूस करत आहेत. या सगळ्या चाहत्यांना आयुषने एक व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेचं काही शूटिंग काल शनिवारी आणि उर्वरित शूटिंग आज लाइव्ह सुरू आहे, अशी माहिती समोर येत आहे. आयुष संजीव त्याच्या व्हिडीओमध्ये सांगतो, “नमस्कार जे-जे मला विचारत आहेत की…फिनाले कोण जिंकलंय? त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की, फिनाले आज संध्याकाळी लाइव्ह पार पडणार आहे. त्यामुळे मला आणि ओमकारला सुद्धा माहिती नाहीये की कोण जिंकलंय. त्यामुळे प्लीज आम्हाला सुद्धा नका विचारू की कोण जिंकलंय…आता आम्ही तिथे जाणार, त्यानंतर आम्हाला समजेल की कोण जिंकलंय.”
दरम्यान, प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनी व जिओस्टारवर १९ एप्रिलला रात्री ८ पासून हा महाअंतिम सोहळा लाइव्ह पाहायला मिळणार आहे. रितेश शोच्या शेवटी विजेत्या स्पर्धकाचं नाव जाहीर करेल. समोर आलेल्या माहितीनुसार पाचव्या स्थानी दिपाली सय्यद एलिमिनेट झाल्याचं बोललं जात आहे. आता लवकरच याबाबत स्पष्टता मिळेल. याशिवाय ग्रँड फिनालेला खास पाहुणे म्हणून अभिषेक बच्चन व जिनिलीया देशमुख हे कलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
