Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा शंभर दिवसांचा खेळ अखेर संपला आहे. तन्वी कोलते या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. यावर्षी टॉप-५ मध्ये तन्वीसह विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद असे दमदार स्पर्धक होते. पण, चाहत्यांची सर्वाधिक मतं मिळवत तन्वीने ‘बिग बॉस मराठी’च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
तन्वी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश घेतल्यापासूनच चर्चेत होती. पहिल्या आठवड्यात तन्वीने संपूर्ण घर गाजवलं होतं. यामुळे अनेकांनी तिच्याबद्दल ‘तन्वी कोलते, खूप बोलते’ असं म्हटलं होतं. पण, तिचा हा प्रवास पुढच्या शंभर दिवसांत पूर्णपणे बदलला. आता तिच्याबद्दल ‘तन्वी बोलते सबको कोलते’ असं तिच्याबद्दल म्हटलं जातं. याशिवाय तिला चाहते ‘क्वीन ऑफ बिग बॉस’ असंही म्हणतात. तन्वी प्रत्येक टास्क मोठ्या हिमतीने खेळली, तिने टास्क क्वीन अशी वेगळी ओळख या घरात निर्माण केली आणि आता तन्वी सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. तर, यावर्षी दुसऱ्या स्थानी बाजी मारलीये राकेश बापटने.
रितेश देशमुखने दिली खास भेटवस्तू
तन्वीला हा शो जिंकल्यावर ‘बिग बॉस मराठी’कडून ट्रॉफी आणि १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे. याशिवाय पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून तन्वीला १० लाखांचं Voucher आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईक देण्यात आली आहे. याशिवाय तन्वीला रितेशने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली.

Bigg Boss Marathi 6 – ट्रॉफी जिंकल्यावर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी म्हणाली, “१०० दिवसांनी ही ट्रॉफी माझ्या हातात आलीये. घरात एन्ट्री घेतल्यापासूनच मी ट्रॉफीचं स्वप्न पाहत होते. पण, जेव्हापासून ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझन सुरू झाला होता… तेव्हापासूनच मी आई-बाबांना सांगत होते की, मला ‘बिग बॉस’मध्ये जायचं आहे. कारण, हा असा एक शो आहे जिथे सगळे आपल्याला आपल्या स्वत:च्या नावाने ओळख मिळते. आजवर मालिका, सिनेमातील नावाने लोक मला ओळखत होते पण, या शोमध्ये असं होत नाही. मला या शोची आधीपासूनच क्रेझ होती. तन्वी कोलते हे नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘बिग बॉस’ हा माझ्यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म होता. आज ‘बिग बॉस’मुळे माझं नाव इतकं मोठं झालंय, आणि त्यांच्यामुळेच माझं स्वप्न पूर्ण झालंय. आले होते तन्वी कोलते म्हणून…आज जातेय तन्वी कोलते हा ब्रँड मिळवून थँक्यू सो मच! मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या चाहत्यांचेही खूप-खूप आभार.”
तन्वीबद्दल जाणून घेऊयात…
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून तन्वी कोलते या छोट्या पडद्यावरच्या Cool सूनबाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ग्रँड प्रीमियर सोहळ्यापासूनच तन्वी सर्वत्र चर्चेत आहे. ती मूळची कोकणातील आहे. विविध सौंदर्य स्पर्धांमध्येही (Beauty Pageant) ती सहभागी झाली होती. मात्र, ‘लक्ष्मी निवास’मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत तन्वीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘लक्ष्मी निवास’मध्ये सिद्धूच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच सिंचनाची भूमिका अभिनेत्री तन्वी कोलते साकारत होती. ती लक्ष्मी-श्रीनिवासची धाकटी सून देखील असते. पण, बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी तन्वीने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता शो संपल्यावर तन्वीला ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची विजेती ही नवीन ओळख मिळाली आहे.
