Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte & Rakhi Sawant Reaction : ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. संपूर्ण सीझन चर्चेत असणारी आणि तंटा क्वीन म्हणून ओळखली जाणारी तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावलं, तर राकेश बापट उपविजेता ठरला. अशातच आता या सीझनमधील वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत हिने तन्वीच विजेती होणार हे तिला आधीच माहीत होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे
‘बिग बॉस मराठी’ सीझन एकनंतरचे चारही सीझनचे विजेते हे पुरुष होते. त्यामुळे आता या सीझनची ट्रॉफी पटकावणारा स्पर्धक ही स्त्री असावी अशी अनेकांची इच्छा होती. स्वत: सीझन एकची विजेती मेघा धाडेनेही ही इच्छा व्यक्त केली होती. तर ‘बिग बॉस’च्या घरात असतानाही तन्वी कोलतेने ती हा रेकॉर्ड मोडणार आणि ‘बिग बॉस’ची ट्रोफी जिंकणार असं म्हटलं होतं. तसं तिने केलंसुद्धा. ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाची ट्रॉफी पटकावल्यानंतर तन्वीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.
राखी सावंत तन्वीबद्दल नेमकं काय म्हणाली?
सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये राखी सावंत तन्वी कोलते व तिची आई यांच्याबरोबर उभी असून ती “पहिल्या दिवसापासून मी सांगत होते तन्वी जिंकणार. कारण माझ्या जिभेवर तीळ आहे.” असं म्हणताना दिसली. यावर तन्वी म्हणाली, “राखीच्या जिभेवर तीळ आहे आणि तिच्याकडे खूप मोठं हृदय आहे. तिने मला सांगितलेलं की मी जिंकणार आणि बघा १०० दिवसांनंतर माझ्या हातात ट्रॉफी आहे आणि मी विजेती ठरले आहे.”
राखी पुढे म्हणाली, “मी बिग बॉस हिंदीला सांगू इच्छीते की सलमान भाई, तन्वी हिंदी बिग बॉसमध्ये जायला हवी आणि मी वाइल्ड कार्ड म्हणून जाणार आणि तिचा वाट लावणार.” यानंतर तन्वीने हे ऐकल्यानंतर राखीला मिठी मारली.
दरम्यान, यापूर्वीसुद्धा ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर काही स्पर्धकांनी हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आणि दुसऱ्या पर्वाचा विजेत शिव ठाकरे यांचा समावेश आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस’ हिंदी सीझन १६चा उपविजेता ठरला. त्यामुळे आता तन्वीसुद्धा ‘बिग बॉस’ हिंदीच्या पुढच्या सीझनमध्ये झळकणार का हे पाहणं रंजक ठरेल
