Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात ‘जादुई दिव्याची Immunity’ हा नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये सदस्यांना बझर वाजल्यावर आपल्या हातातले दिवे समोर ठेवण्यात आलेल्या दगडांवर ठेवायचे होते. जे सदस्य दगडांवर दिवे ठेवण्यात असमर्थ ठरतील त्यांच्या गळ्यात ज्याचा फोटो आहे. तो सदस्य थेट नॉमिनेट होणार होता. या टास्कमध्ये वैभवची आर्या-अभिजीतबरोबर भांडणं झाली होती.
‘बिग बॉस’ने शेवटी या तिघांच्या गळ्यात फोटो असणाऱ्या तिन्ही सदस्यांना नॉमिनेट केलं. नॉमिनेशन कार्यात आर्या, वैभव, अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता असे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडल्यावर संपूर्ण समीकरण बदलून जातं. निक्कीने कान भरल्यावर वैभवने याच टास्कबद्दल अभिजीतला जाब विचारला. यावर अभिजीतने “मी असं तुझ्या मागून काहीच बोललो नाहीये” असं त्याला सांगितलं.
अभिजीतने निक्कीला सुनावलं
वैभव-अभिजीतचे वाद सुरू असताना निक्की म्हणते, “तू हे नाही बोलला का…आम्ही याच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा वैभवने तेच केलं.” निक्कीचं म्हणणं ऐकून अभिजीत खूपच संतापतो. तो थेट तिला म्हणाला, “तुझा मित्र समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना…हीच माझी चूक आहे. यापुढे तू माझ्याकडे येऊ नकोस… मी सुद्धा तुझ्याकडे बोलायला येणार नाही. असे मित्र आयुष्यात कधीच ठेवू नयेत.”
निक्की-अभिजीत वेगवेगळ्या टीममधून खेळत असले तरीही दोघांमध्ये चांगली मैत्री होती. परंतु, निक्कीने वैभवसमोर गैरसमज निर्माण केल्याने आता अभिजीत तिच्यावर चांगलाच संतापला आहे. आता निक्की-अभिजीतची मैत्री कायमची तुटणार की, पुन्हा गेमसाठी दोघेही एकमेकांशी संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, अभिजीत-निक्कीच्या भांडणाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल केलं आहे. “अभिजीत बरोबर आहे…निक्की मैत्रीला पात्र नाही”, “वैभवने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.. वैभव ये बाहेर आता” अशा कमेंट्स या प्रोमोवर युजर्सनी केल्या आहेत.