Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज प्रेक्षकांना मोठा ड्रामा पाहायला मिळाला. राकेश बापट व अनुश्री या दोघांमध्ये सर्वात आधी बेडवरून वाद झाला. कारण, अनुश्री राकेशच्या बेडवर गाढ झोपली होती, यादरम्यान राकेशची प्रकृती बरी नव्हती. त्याला डॉक्टरांनी औषध देखील पाठवलं होतं. त्यामुळे, ‘प्लीज माझ्या जागेवरून उठ आणि दुसरीकडे झोप’ अशी विनंती राकेशने अनुश्रीला केली. अनेकदा प्रेमाने समजावून सुद्धा अनुश्री काही केल्या ऐकली नाही शेवटी राकेशने घराची कॅप्टन प्राजक्ता आणि शोमधील अन्य महिला सदस्य दिपाली, तन्वी, रुचिता, राधा या मुलींना अनुश्रीला माझ्या जागेवरून उठवा असं सांगितलं.

यानंतर घरातील सगळी मंडळी बेडरूम एरियामध्ये जमली. प्रत्येकाने अनुश्रीला दुसरीकडे जाऊन झोप हा राकेशचा बेड आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही केल्या ऐकली नाही. शेवटी कंटाळलेल्या राकेशने तिचा हात धरून तिला उठवलं…पण, अनुश्री जराही हलली नाही. शेवटी अनुश्री राधावर जोरात किंचाळली आणि यामुळेच या न ऐकणाऱ्या अनुश्रीला समजवण्यापेक्षा आपण आपला वेगळा मार्ग काढू असा विचार प्रत्येकाने केला.

Bigg Boss Marathi – रुचिताचे राकेश बापटवर आरोप, रुचिताने वाद वाढवला…

दुसऱ्या दिवशी, सकाळी “राकेशने हात लावून आपल्याला खेचलं ही गोष्ट मला जराही आवडली नाही” अशी कबुली अनुश्रीने रुचितासमोर दिली. याच गोष्टीवरून घरात वाद उफाळला. खरंतर, रुचिताचा वाद करणबरोबर सुरू होता, यावर राकेश “आता शांत राहा, बास झालं” असं तिला सांगत होता.

Award Banner

यावेळी रुचिताने शांत राहण्यापेक्षा राकेशला उलट जाब विचारण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, “पोरींना परवानगीशिवाय हात लावायचा नाही एवढंही कळत नाही आणि म्हणतात शांत बस. अनुश्री झोपली होती तेव्हा ते ( राकेश ) तिला खेचत होते…हे तिला अजिबात आवडलं नव्हतं. बायका कशा झोपलेल्या असता हे तुम्हाला माहिती नाही का?”

रुचिताच्या या गंभीर वक्तव्यानंतर दिपाली, प्राजक्ता आणि दिव्या यांनी मध्यस्थी करून “हे आता अति होतंय” अशी तिला समज दिली. पण, रुचिता काही केल्या ऐकत नव्हती….तिने वाद आणखी वाढवला. यानंतर अनुश्री स्वत:ची बाजू मांडण्यासाठी उठली. अनुश्री म्हणाली, “मला आतापर्यंत कोणत्याही टास्कमध्ये त्यांनी जराही हात लावला नव्हता…याबद्दल त्यांचं कौतुक आहे. पण, त्यादिवशी मी गाढ झोपेत होते…तेव्हा ते माझा हात खेचून मला उठ..उठ म्हणाले… मला खेचलं. मी त्यांना बोलले सुद्धा दादा हे करू नकोस.”

राकेश यावर म्हणाला, “यानंतर मी तुझा लगेच सोडला. मी तुला बहिणीसारखं सांगत होतो की, तुझ्यामुळे अनेकांना त्रास होतोय. तुझ्यामुळे दुसरे कोणी खाली झोपले तर त्यांना त्रास होईल…माझीही पाठ दुखत होती पण, तू कुणाचंच ऐकत नव्हती. बरं मी सर्वात आधी तुला प्रेमाने सांगितलं. मग, ताईंना (दिपाली) बोललो…तू कोणाचंच ऐकलं नाहीस. मी या घरात पहिल्या दिवसापासून तुझी मदत केली होती. फक्त मला बरं नव्हतं म्हणून मी तुला विनंती केली. पण, तू ऐकलीच नाहीस. मी तुला फक्त उठवलं.”

अनुश्री पुढे म्हणाली, “माझा कोणी भाऊ वगैरे नाहीये इथे… मला माझ्या परवानगीशिवाय कुणीच हात लावू शकत नाही. हा माझा मुद्दा आहे.”

तन्वीने घेतली राकेशची बाजू

तन्वी यावेळी विशालला म्हणाली, “तो ( राकेश ) खूप जेंटलमन माणूस आहे. त्याने तसा हात लावलाच नव्हता. हे खूप वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. ती फार चुकीचं बोलतेय…तो मला खूप वेळ सांगत होता, तन्वी तिला उठव. त्याची काहीच चूक नाहीये. हे सगळं अनुश्री बोलतेय… थांबवा तिला कोणीतरी…खरंच त्याची चूक अजिबातच नाही. मी तिथेच होते. हात खेचला तेव्हाही ती पूर्ण जागी होती…ती झोपलेली नव्हती.”

राकेशचा संताप

राकेश व अनुश्रीचे वाद शेवटी टोकाला जाऊन पोहोचले होते. अनुश्री-रुचिताचे आरोप ऐकून राकेश हैराण झाला होता तो चिडून म्हणाला, “तुला हात लावण्याची कुणाचीच इच्छा नाहीये. मी २५ वर्षे इतकं काम केलंय…मला आजवर असं कुणीही बोललं नाहीये, इतकी हिंमत कुणाचीच झालेली नाहीये. हे इतकं सगळं होणार असेल तर मला या घरात थांबायचं नाहीये. माझी २५ वर्षांची मेहनत तुम्ही अशी वाया घालवू शकत नाही.”

यानंतर राकेश चिडून गार्डन एरियामध्ये निघून गेला. रागात फेऱ्या मारताना त्याने काचेवर जोरात पंच दिला. त्याला अनुश्री-रुचिताने केलेले आरोप अजिबात सहन झाले नाहीत. आता यावर रितेश देशमुख अनुश्री-रुचिताला काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.