Bigg Boss Marathi 6 Grand Finale Eviction : अखेर शंभर दिवसांचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा महाअंतिम सोहळा आज १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. ‘कलर्स मराठी’वर रात्री ८ वाजता या ग्रँड फिनालेचं प्रसारण केलं जाईल. तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट आणि दिपाली सय्यद या पाच सदस्यांपैकी कोण बाजी मारणार, कुणाच्या हातात ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची ट्रॉफी जाणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता घरात असलेल्या टॉप-५ स्पर्धकांपैकी कोण पहिलं एलिमिनेट होईल, कोणाचा प्रवास संपेल याबद्दलची मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. ‘कलर्स मराठी’ने नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमधील पहिल्या एव्हिक्शनचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश टॉप-५ सदस्यांना एक ऑफर देणार आहे. ही ऑफर दरवर्षी दिली जाते.
टॉप-५ सदस्यांना सुरुवातीला मनी बॅग उचलण्याचा ऑप्शन दिला जातो. या पैशांच्या बॅगेत लाखो रुपये असतात, जो सदस्य बझर वाजवून स्वत:ला एलिमिनेट करतो त्याला ही पैशांची बॅग मिळते. यंदा या मनी बॅगेत पाच लाख रुपये आहेत. प्रोमोमध्ये राकेश बापट बझर वाजवण्यासाठी पुढे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राकेश मनी बॅग घेऊन गेम सोडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. इतकंच नव्हे राकेश बझरच्या दिशेने पुढे येतोय हे पाहून मंचावर उपस्थित अन्य स्पर्धकांनाही धक्का बसतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश बापट मनी बॅगसाठी गेम सोडणार नाहीये. हा प्रोमो फक्त प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी आहे. प्रत्यक्षात पाचव्या स्थानी दिपाली सय्यद एलिमिनेट झाली असल्याची अपडेट समोर आली आहे. याशिवाय या प्रोमोच्या कमेंट्समध्ये सुद्धा दिपाली एलिमिनेट होईल असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
दिपाली पाचव्या स्थानी एलिमिनेट झाल्यावर शोमध्ये अनुश्री माने, तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन हे चारजण बाकी राहतील. त्यामुळे काटा ग्रुपचे दोन जण आणि टोळीचे दोन जण असा बॅलन्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा हा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना आज ( १९ एप्रिल २०२६ ) रात्री आठ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळेल.
