Jay Dudhane And Harshala Patil Wedding : गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. सूरज चव्हाण, पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड यांनी नुकतीच आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता यात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. हा अभिनेता म्हणजे जय दुधाणे.

‘बिग बॉस मराठी सीझन ३’मुळे आणि विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला फिटनेस फ्रीक अभिनेता म्हणजे जय दुधाणे. जयनं आपल्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

गेले दोन दिवस जयच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अभिनेत्यानं लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर जयच्या लग्नातील काही खास क्षण व्हायरल झाले आहेत.

Award Banner

जयने त्याची मैत्रीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. जय-हर्षला यांच्या कुटुंबियांच्या तसंच मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो-व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी जोडप्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जय दुधाणे आणि हर्षला पाटील अडकले लग्नबंधनात
जय दुधाणे आणि हर्षला पाटील अडकले लग्नबंधनात

जयनं लग्नात पिवळ्या रंगाचा डिझाइनर कुर्ता आणि त्यावर धोतर, तसंच डोक्यावर फेटा असा पारंपरिक लुक केला होता. तर जयची पत्नी हर्षलानं पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. तर या लुकला साजेसा असा साजशृंगारही तिनं केला होता. लग्न लागताच दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. दोघांवर सध्या कलाकार आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

दरम्यान, जयनं मार्च महिन्यात त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून या खास फोटो शेअर करत चाहत्यांना प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. उत्तराखंडमधील मसुरी इथे जयनं हर्षलाला रोमँटिक अन् फिल्मी स्टाईलनं प्रपोज केलं होतं. अशातच आता जय आणि हर्षला यांनी त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

जय दुधाणे आणि हर्षाला पाटील अडकले लग्नबंधनात
जय दुधाणे आणि हर्षाला पाटील अडकले लग्नबंधनात

जयच्या पत्नीबद्दल सांगायचं झाल्यास, ती एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोअर्स असून ती तिच्या फॅशन आणि ट्रॅव्हल संदर्भातील व्हिडीओंसाठी ओळखली जाते. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अशातच आता जय-हर्षला साताजन्माचे साथीदार बनले आहेत.