Bigg Boss Marathi Fame Rakesh Bapat Talks About Second Marriage : राकेश बापट मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं हिंदी चित्रपट, मालिकांमध्येही काम केलं आहे. अभिनेता सध्या ‘बिग बॉस मराठी’सीझन ६ मुळे चर्चेत आहे. त्यामध्ये त्यानं सहभाग घेतला असून, घरातील त्याच्या सहभागामुळे तो कायम चर्चेत असतो. अशातच आता अभिनेत्यानं त्याच्या खासगी आयुष्यातील एका इच्छेबद्दल सांगितलं आहे.
राकेश बापट इंडस्ट्रीतील देखण्या नटांपैकी एक आहे. त्याच्या पर्सनॅलिटीमुळे त्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत. अनेक जण त्यासाठी त्याचं कौतुकही करत असतात. त्याचा फिमेल फॅन फॉलोईंगही मोठं आहे; पण राकेश बापट खऱ्या आयुष्यात सिंगल आहे. अशातच आता त्यानं भविष्यात जर त्यानं कधी लग्न केलं, तर त्याला कशी जोडीदार हवी आहे याबद्दल सांगितलं आहे.
राकेश बापटनं हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्न केलेलं. दोघांचा प्रेमविवाह होता. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘बिग बॉस’ ओटीटीमध्ये सहभाग घेल्यानंतर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. ‘बिग बॉस’च्या घरातच त्यांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले; पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्यानं त्याला कशी बायको हवी आहे याबद्दल सांगितलं आहे.
राकेश बापटला हवी आहे ‘अशी’ बायको
‘कलर्स मराठी’ वाहिनीनं ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये राकेश, प्राजक्ता शुक्रे व दीपाली सय्यद एकत्र बसल्याचं पाहायला मिळतं. यादरम्यान राकेश त्यांच्याशी बोलताना त्याला कशी जोडीदार हवी आहे याबद्दल बोलताना दिसत आहे. राकेश म्हणाला, “मी जर कधी लग्न केलं, तर एका गायिकेशी करेन. ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. ती सकाळी उठून ओले केस मोकळे सोडून साडी नेसून तानपुरा वाजवत असेल. तिला तसं गाताना मी बघत बसेन.”
दरम्यान, राकेश बापट ‘बिग बॉस मराठी’पूर्वी ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेला. त्यामध्ये त्यानं मुख्य नायकाची भूमिका साकारलेली. त्यातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला.
