Bigg Boss Marathi 6 Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवव्या दिवशी कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. यामध्ये स्पर्धकांसमोर दोन दारं असतील. यापैकी एक दार आहे शेणाचं आणि दुसरं दार आहे मेणाचं. आता कोणते सदस्य शेणाच्या घरात जाणार आणि मेणाच्या घरात एन्ट्री घेऊन कॅप्टन्सीची उमेदवारी कोण मिळवणार? हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.
कॅप्टन्सी कार्यासाठी घरात ३-३ स्पर्धकांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. यातील पहिली जोडी आहे दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि दिव्या शिंदे. या तिघांमध्ये दिव्या कॅप्टन होण्यास पात्र नाही असा दावा अनुश्रीकडून केला जातो. पण, दिव्या यावर जोरदार प्रत्युत्तर देते.
Bigg Bigg Marathi 6 : रुचिताला शेणाच्या घरात कुणी पाठवलं?
पुढचं त्रिकुट असतं सागर कारंडे, रोशन भजनकर आणि अनुश्री माने. याशिवाय रुचिता जामदार, आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांच्यामध्ये सुद्धा कॅप्टन्सी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार चुरस रंगणार आहे. पण, यावेळी एक अनपेक्षित गोष्ट घडते…रुचिताच्या विरोधात अनुश्री आणि राधा या तिच्याच दोन मैत्रिणी असतात. त्याच तिला शेणाच्या घरात पाठवतात.
यामुळे वैतागलेली रुचिता आता यापुढे या माझ्या मैत्रिणी नाहीयेत असं सर्वांना सांगते. स्वत: शेणाच्या घरात गेल्यावर ती तन्वीला सुद्धा रागात या कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून बाहेर काढते. मला यापुढे कोणालाच सपोर्ट करायचा नाहीये असं रुचिता म्हणते.
रुचिताच्या या निर्णयामुळे तन्वी कोलतेला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार आहे. आता तन्वी यावर काय बोलणार? ती रुचिताला प्रत्युत्तर देईल का? या दोघींमुळे जर आयुषला फायदा झाला तर तो या संधीचं सोनं करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आजच्या भागात मिळतील.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहेत. “या लोकांची लोकल गँग आहे रुचिता-राधा- अनुश्री- तन्वी”, “हे लोक आपआपसांत गेम खेळत आहेत”, “यांना मैत्रीही जपता येईना”, “आता आयुष कॅप्टन झाला पाहिजे”, “अनुश्रीकडून आता निगेटिव्ह Vibes येऊ लागल्या आहेत”, “या लोकांना कधीच समजणार नाही मैत्री कशी जपली पाहिजे”, “रुचिताला सर्वात आधी घराच्या बाहेर काढा” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
