Bigg Boss Marathi 6 Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात रुचिता जामदारने संपूर्ण घरात गोंधळ हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला तिची भांडणं करण सोनावणेबरोबर झाली. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये राकेश बापटने रुचितावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर संपूर्ण घरात रुचिताने रडून-रडून गोंधळ घातला. तोंडाला येईल ती बडबड करणं, सर्वांशी भांडायचं असं सगळं रुचिता करताना दिसतेय.
आतापर्यंत प्रेक्षकांना रुचिताचे टोळीसोडून घरातील अन्य सदस्यांशी वाद होत होते. विशेषत: तन्वी कोलते आणि रुचिता यांच्यात कायम भांडणं होत असतात. पण, आता पहिल्यांदाच रुचिता आणि अनुश्री माने यांच्यातील भांडण प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळेल. दोघीही वॉशरूम एरिआमध्ये बसून एकमेकींशी जबरदस्त भांडत असल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय.
रुचिता अनुश्रीशी वाद घालताना म्हणते, “मला जे बोलायचं आहे ते मी बोलणार” यावर अनुश्री तिला सांगते, “प्रत्येकवेळी तलवार काढून खेळायची गरज नसते. खरंतर, अनुश्री तिला कॅप्टन्सी उमेदवारी टास्कपासून समजवण्याचा प्रयत्न करतेय पण रुचिता तिचं काही केल्या ऐकत नाहीये. रुचिता पुढे म्हणते, “अगं ए फुसके…तुझे हे टॅक्टिक्स घराबाहेर चालव.”
रुचिता आपलं ऐकणार नाहीये हे लक्षात आल्यावर अनुश्री वैतागून म्हणते, “तू तुझी काशी कर” यानंतर सगळ्या मर्यादा ओलांडून रुचिताने आपल्या मैत्रिणीला ‘आ…थू’ म्हटलंय. “आ…थू! अशीच आहेस तू” असं रुचिता चिडून अनुश्रीला सांगते.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “टोळीतील सदस्य कधीच एकमेकांशी भांडणार नाहीत असं म्हणणाऱ्या लोकांना हा व्हिडीओ पाठवा”, “या रुचिताला आता बाहेर काढा”, “हा प्रोमो पाहून मी अनुश्रीला सपोर्ट करणार आहे”, “अनुश्री हिच्यापेक्षा नक्कीच बरोबर आहे”, “या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो”, “आता मजा येणार”, “बरं झालं यांच्या टोळीत भांडणं झाली” अशा प्रतिक्रिया यावर प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

