Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर यंदा ‘गणेशोत्सव विशेष’ भाग साजरा करण्यात आला. गेल्या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट होते. यापैकी घन:श्याम दरवडेने म्हणजेच छोट्या पुढारीने घराचा निरोप घेतला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा भाऊच्या धक्क्यावर संदीप पाठक, उत्कर्ष शिंदे अशा अनेक खास पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.
रितेशने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्व सदस्यांना एक खास गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे त्याची पत्नी जिनिलीया देशमुखने सर्व सदस्यांना खास उकडीचे मोदक बनवून पाठवले होते. अरबाजला स्टोअर रुममध्ये जाऊन रितेशने हे मोदक आणण्यास सांगितलं. उकडीचे मोदक पाहून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरातल्या सगळ्या सदस्यांनी याबद्दल रितेश व जिनिलीया यांचे आभार मानले. मात्र, सगळे आनंदाने मोदकाचा आस्वाद घेत असताना सूरजच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं
हेही वाचा : ठरलं तर मग : रविराज उचलणार मोठं पाऊल! प्रियाला सर्वांसमोर थेट कानाखाली मारणार; ‘त्या’ कृतीवर संताप, पाहा प्रोमो
सूरजचं होतंय कौतुक
रितेशने अरबाजला “मोदक सर्वांना द्या” असं सांगितलं. यावर सूरज चव्हाणने रितेशला “सर, मी हा मोदक बाप्पासमोर ठेवू का?” असं विचारलं. यावर “अरे ठेवा ना…बाप्पाला मोदक द्या…तुम्ही सुद्धा आणखी एक घ्या!” असं उत्तर रितेशने दिलं. गणेशोत्सव विशेष भाग असल्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गणपती बाप्पाचा फोटो असलेलं मोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. याठिकाणी गणपती बाप्पाला हात जोडून सूरजने नमस्कार केला. पुढे गेल्यावर गणरायासमोर त्याने मोदक ठेवला आणि तो खाली वाकून गणपती बाप्पाच्या पाया पडला. यानंतर अरबाजने सूरजला आणखी एक मोदक दिला.
सध्या सूरज चव्हाणच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्याचा साधेपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावला. याआधी “गणपती बाप्पाच्या कृपेने मी कॅप्टन झालो” असं सूरज म्हणाला होता. आता मोदकाचा प्रसाद सर्वात आधी बाप्पाला अर्पण केल्याने सूरजने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
दरम्यान, सूरजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता येत्या आठवड्यात कॅप्टन्सी सांभाळून सूरज घराकडे ( Bigg Boss Marathi ) कसं लक्ष देणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd