Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असतानाच आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर निक्कीने संपूर्ण घरात रडून आरडाओरडा सुरू केला. तसेच आताच्या आता आर्याला घराबाहेर काढा किंवा मी घरातून बाहेर जाते या निर्णयावर निक्की ठाम होती. आता ‘बिग बॉस’ आर्याला काय शिक्षा देणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी घरातील आणखी एक प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात जान्हवी निक्कीला ओपन चॅलेंज देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पहिल्या दिवसांपासून एकत्र असलेल्या ‘ए टीम’च्या मैत्रीत आता कायमची फूट पडली आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जान्हवीने अरबाज विरोधात मत देत त्याला या खेळाच्या बाहेर केलं आहे. यामुळे निक्की तिच्यावर भयंकर संतापते. खरंतर, यापूर्वी झालेल्या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये अरबाज दुसऱ्याच फेरीत जान्हवीला बाद करतो. याचा बदला म्हणून ‘जादुई हिरा’ उचलून जान्हवी अरबाजला कॅप्टनपदाच्या अंतिम शर्यतीतून बाहेर काढते.
जान्हवीने निक्कीला दिलं ओपन चॅलेंज
अरबाजला बाद केल्यामुळे निक्की प्रचंड संतापलेली असते. यावरूनच आता निक्कीचे जान्हवीशी वाद होणार आहेत. या भांडणांदरम्यान जान्हवी निक्की खुलं आव्हान देणार आहे. ती म्हणते, “तुझ्यात दम असेल, तर मला बाहेर काढून दाखव…चॅलेंज आहे माझं तुला. मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून तू आलीस शोमध्ये…सगळ्यांसाठी तू या घरामध्ये घाण झाली आहेस”
निक्की यावर “कॅप्टन्सीवरून तुला काढलं ना… याचा लय राग आलाय तुला…गटारासारखे शब्द आहेत तुझे” अशी प्रतिक्रिया देत तिला प्रतिउत्तर देते. यानंतर डीपी येऊन जान्हवीला निक्कीपासून दूर नेत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi- आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”
जान्हवीने गेल्या काही दिवसांत तिचा गेम पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे नेटकरी सध्या तिचं कौतुक करत आहे. या प्रोमोवर बऱ्याच युजर्सनी कमेंट्स करत जान्हवीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात आर्याला काय शिक्षा होणार आणि जान्हवी निक्कीच्या वादावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर ( Bigg Boss Marathi ) काय मत मांडणार याकडे संपूर्ण घराचं लक्ष लागलेलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd