Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये निक्की आणि तिच्या टीमने बाजी मारली. निक्कीची टीम जिंकली असली तरीही, चुकीचं वर्तन करून तुम्ही विजयी झालात असा आरोप खेळ संपल्यावर B टीमकडून करण्यात आला.
“निक्कीने आमच्या बाहुलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाय तोडला हे एकदम चुकीचं आहे. आपण आपल्या बाळांची अशी काळजी घेऊ का?” असा सवाल खेळ संपताच अभिजीतने उपस्थित केला. परंतु, सरतेशेवटी निक्की व टीमने या टास्कमध्ये बाजी मारली. मात्र, या सगळ्यात घरात नवा वाद निर्माण झाला आहे. निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे. एवढंच नव्हे तर अंकिता सुद्धा भावुक झाल्याचं आजच्या भागात पाहायला मिळालं. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात…
हेही वाचा : Bigg Boss Marathi Video : “दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा…”, अंकिता घन:श्यामवर प्रचंड भडकली! ‘बिग बॉस’च्या घरातील नवा प्रोमो चर्चेत
Bigg Boss Marathi च्या घरात नेमकं काय घडलं?
घरात ( Bigg Boss Marathi ) टास्क सुरू असताना निक्कीने B टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा यांनी, “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं” असं म्हटलं. यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…” अंकिता हे वाक्य ऐकताच प्रचंड भावुक झाली. ती रागात निक्कीला म्हणाली, “ए…तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच बिग बॉस म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू जे बोलतेय…ते सहन होणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलतेस.”
अंकिता भडकल्यावर निक्की तिला म्हणते, “हे तू मला सांगू नकोस… या स्वत:च तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात.” निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.”
जान्हवी काही वेळानंतर वर्षा उसगांवकर अन् त्यांच्या टीमशी संवाद साधताना म्हणाली, “तुमच्यासारखं आम्हीपण निक्कीला समजावू शकत नाही. तुम्हाला माहितीये तिचा स्वभाव…” पंढरीनाथ यावर म्हणाला, “मुलांवरून गॉसिप करणं प्रचंड चुकीचं आहे. आज इंडस्ट्रीत यांच्याबद्दल कोणी चकार शब्दही काढत नाही.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हे लोक खरे परप्रांतीय”, अरबाज-वैभवचं मालवणी भाषेबद्दल वक्तव्य; मराठी अभिनेता संतापून म्हणाला, “देवा महाराजा…”
निक्की या सगळ्या प्रकरणावर अरबाजशी संवाद साधताना म्हणते, “त्यांना मुलं नाहीत हे मला माहिती नव्हतं… धनंजय सरांनी मला याबद्दल केव्हातरी सांगितलं होतं. टास्कमध्ये त्या पण मला “इतक्या काळ्या मनाची आई नको” वगैरे असं म्हणत होत्या… तेव्हाच मला राग आला होता. आता त्या मला “बाळाच्या तंगड्या तोडल्या” असं म्हणाल्या आणि हसायला लागल्या… त्यावर मी त्यांना असं म्हणाले, एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती? असं माझ्या तोंडून निघालं आणि आता हा वाद मला वाढवायचा नाहीये.”
दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये काम करताना निक्कीने वर्षा यांची घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. “मॅम मी जे काल बोलली त्यासाठी सॉरी… मला वाईट वाटलं, तुमच्याशी कसं बोलू मला कळत नव्हतं… मी धीराने तुमच्यासमोर आता आलीये आणि मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मनापासून सॉरी” यावर, “तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठिके” अशी प्रतिक्रिया वर्षा यांनी दिली आहे.
नेटकऱ्यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्त्वाबद्दल बोललं गेलंय…हे लाइव्ह स्क्रीनवर बोलणं चुकीचं आहे.” दुसरा एक युजर म्हणतो, “खूप फालतू खेळ आहे… या निक्कीला वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? आता निक्कीने हद्दपार केली आहे. हाकलून द्या निक्कीला… नंतर माफी मागून काहीच उपयोग नाही”, आणखी एका युजरने, “स्वत: स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य आहे? यांना लाज वाटली पाहिजे…”, “एक स्त्री, महिला म्हणून आपण कमी पडलोय” अशा अनेक कमेंट्स सध्या नेटकऱ्यांकडून येत आहेत. निक्कीने केलेल्या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, घरात हे वक्तव्य केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठवल्यावर निक्कीने वर्षा उसगांवकरांची माफी मागितली आहे.