Bigg Boss Marathi 6 Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा आता चौथा आठवडा सुरू झालेला आहे. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. सोनाली राऊतच्या एक्झिटनंतर सध्या एकूण १५ स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात आहेत. या सगळ्यांना चौथ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’ने जोडीच्या बेडीत अडकवलं आहे.

आता घरातील सगळ्या स्पर्धकांना ‘बिग बॉस’ने ठरवून दिलेल्या जोड्यांबरोबर वावरायचं आहे. राकेश बापट-अनुश्री माने, तन्वी-रुचिता अशा हटके जोड्या ‘बिग बॉस’ने जुळवल्या आहेत. यानंतर घरात पार पडलं नॉमिनेशन कार्य.

घरात Weak गेम खेळणाऱ्या तीन स्पर्धकांना प्रत्येकाला नॉमिनेट करायचं होतं. यावेळी ‘नॉमिनेशनची कुऱ्हाड’ या टास्कदरम्यान दोघांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. यापैकी पहिला स्पर्धक म्हणजे सचिन कुमावत. दिव्याला नॉमिनेट करताना त्यांना भरून आलं होतं.

तर, दुसरीकडे आयुषने सर्वात आधी ओमकारला नॉमिनेट केलं. ही गोष्ट ओमकारला प्रचंड हर्ट झाली. यानंतर ओमकारने सुद्धा रागात आयुषच्या फोटोवर कुऱ्हाड मारली. आपल्या जवळच्या आणि घरातील पहिल्या मित्राने आपल्याला नॉमिनेट केलं यामुळे ओमकार खूप दुखावला गेला आणि त्याला अश्रू अनावर झाले होते.

या टास्कदरम्यान बराच ड्रामा पाहायला मिळाला. प्रभू आणि विशाल यांच्यातही वाद झाले. प्रभू आता वीस वर्षांचा आहे तो अजिबात लहान नाहीये हे घरातील प्रत्येक सदस्याला आता कळून चुकलेलं आहे.

Bigg Boss Marathi Day 22 : घरातील ‘हे’ नऊ स्पर्धक झाले नॉमिनेट

ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, अनुश्री माने, दिव्या शिंदे, रोशन भजनकर, राकेश बापट

दरम्यान, आता हा संपूर्ण आठवडा सगळ्या स्पर्धकांना ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या जोड्यांमध्ये टास्क परफॉर्म करायचे आहेत. आता या जोड्यांमुळे घरातील गणितं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय तन्वीवर ज्या चोरीचा आरोप लावला गेला त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे जाणून घेण्याचीही प्रत्येकाला उत्सुकता आहे.