Bigg Boss Marathi 6 Day 2 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवर गप्पा मारत असताना लावणीचा विषय निघाला. यावेळी दिपाली सय्यद तिच्या करिअरमधील विविध अनुभव घरातील सदस्यांना सांगत होती. यादरम्यान, दिपालीने महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती, लावणीच्या नावाने सुरू असलेला डान्स यावर आपलं परखड मत मांडलं. यावेळी दिपालीच्या मताशी प्राजक्ता शुक्रेसह अन्य सदस्य सुद्धा सहमत होते. मात्र, नृत्यांगना राधा पाटील दिपालीचं हे वक्तव्य ऐकून तन्वी कोलतेसमोर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
पण, शेवटी राधाने दिपालीवर मागून टीका करत डान्स इंडस्ट्रीमध्ये तिच्यापेक्षा माझं जास्त नाव आहे असा दावा केला आहे. हा वाद नेमका काय आहे? वाचा…
दिपाली सय्यद अन्य स्पर्धकांसह डायनिंग टेबल एरियामध्ये बसली होती. यावेळी दिपाली म्हणाली, “लावणीला आपण महाराष्ट्राची शान म्हणतो. तुम्ही जर खरी लावणी काय असते हे पाहायला गेलात तर तुम्हाला समजेल की ही लोककला किती सुंदर आहे. लावणीला एक परंपरा आहे…पण आता बघा काय केलंय, लावणीला Cheap करून टाकलं आहे. आता हे सगळं वेगळ्याच लेव्हलला गेलंय. बिहारमध्ये असं सगळं चालतं पण, लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती समजली जाते. आपण रंगमंचावर लावणी म्हणून काय सादर करतोय याचं भान असावं. आता सेक्सी, हॉट कपडे घालतात आणि डान्स करतात. प्रत्येकाबद्दल मला आदर आहे पण, तुम्ही बार डान्सरसारखा डान्स स्टेजवर घेऊन येताय…आणि या सगळ्याला लावणीचं नाव देताय तर ते चुकीचं आहे. वेस्टर्न डान्स करताय तर त्याला लावणी म्हणू नका” यावेळी त्याठिकाणी राधा पाटील सुद्धा उपस्थित होती.
तिथल्या तिथे वाद घालण्यापेक्षा राधाने त्या क्षणाला शांत राहणं उचित समजलं आणि थोड्यावेळाने राधा आणि तन्वी या दोघी फेरफटका मारण्यासाठी बाहेर आल्या.
राधा पाटील यावर तन्वी कोलतेशी संवाद साधताना म्हणाली, “हे सगळे लावणीबद्दल बोलत होते…मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मी का या लोकांना महत्त्व देऊ? मला या सगळ्या फालतू गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची नव्हती. मी स्टेजवर काय करते आणि काय नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही माझे शो कधी पाहिलेत का? मी एका पॉडकास्टमध्ये सुद्धा बोलले आहे. मी माझ्या शोमध्ये फक्त एकच लावणी करते आणि बाकीचे डान्स वेस्टर्न गाणी, मॅशअपवर असतात. आताची पिढी वेगळी आहे. जे आताच्या पिढीला आवडतंय तेच मी करतेय. जर माझं काम खूप घाणेरडं असतं किंवा माझं काम लोकांना नसतं आवडलं तर आज मी इथे नसते.”
“दिपाली ताई माझ्यासाठी सिनिअर आहेत. जेव्हा मला समजलं की, त्या सुद्धा शोमध्ये आहेत. तेव्हा मी ठरवलं होतं…मी त्यांचा खूप आदर करेन. कारण त्या डान्स इंडस्ट्रीमधल्या आहेत, त्यांनी खूप सुंदर लावण्या सादर केल्या आहेत. पण, आता मी बघतेय त्या मला इग्नोर करतात…हे सगळं मला आवडत नाही. मी आता फक्त एक आठवडा वाट बघणार आणि जर मला कोणी काही बोललं ना तर मी खरंच सोडणार नाही. लावणी, डान्सवरून मला जे काही बोलत आहेत…मी सुद्धा लायकी काढू शकते.” असं राधाने सांगितलं.
यावेळी तन्वी राधाची समजूत काढत म्हणाली, “आपण कोणाची लायकी नाही काढायची. आपण जशास तसं उत्तर द्यायचं. कोणाच्या प्रोफेशनवरून बोलू नये…आपण त्यांना दाखवून द्यायचं की, तुम्ही चुकताय. आपल्याला कमी लेखलं जातंय ही चांगली गोष्ट आहे. गर्वाचं घर नेहमी खाली असतं.”
पुढे राधा म्हणाली, “ती ( दिपाली ) पण तर डान्स करत होती. डान्समध्ये जेवढं माझं नाव आहे…तेवढं तिचं नाव कुठे आहे? मला तरी नाही वाटत की तिने काही करून दाखवलंय. नुसता अभिनय आणि हे-ते करून इथे आलीये…काही फायदा नाहीये.”
