Bigg Boss Marathi 6 Vishal-Raqesh : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राकेश आणि विशालमध्ये जोरदार भांडण झाल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. विशालने नॉमिनेशन टास्कदरम्यान राकेशच्या घटस्फोटबद्दल भाष्य केलं. वैयक्तिक गोष्टीचा उल्लेख केल्यामुळे राकेश सुद्धा विशालवर भडकला. हे दोघंही एकमेकांना भिडले. यादरम्यान विशालने राकेशला धक्का मारला…इतकंच नव्हे तर विशाल RBच्या अंगावर धावून गेल्याचं सुद्धा व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

यावर संपूर्ण मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया येत आहे. अशाप्रकारे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं अतिशय चुकीचं आहे असं स्पष्ट मत मेघा धाडे, रुपाली भोसले यांसारख्या कलाकारांनी व्यक्त केलं आहे. आता या पाठोपाठ राकेशच्या कुटुंबीयांनी सुद्धा घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राकेश बापटच्या कुटुंबीयांकडून निवेदन

आम्ही, राकेश बापट यांचे कुटुंबीय… ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ मधील स्पर्धक विशाल कोटियन यांच्याकडून अलीकडे घडलेल्या घटनेबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या कथनांबाबत आमची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. विशाल यांनी शोमध्ये इतरांच्या वैयक्तिक बाबींचा उल्लेख केला आहे, जो स्पर्धकांनी केलेल्या कराराचा भंग आहे. त्यामुळे आम्ही याचा सार्वजनिकरित्या तीव्र निषेध करीत आहोत.

Award Banner

राकेश यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता, विशेषतः रितेश देशमुख यांचा या शोमध्ये सहभाग असल्यामुळे हा मंच सुसंस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबीयांसह पाहण्यास योग्य राहील, असा त्यांचा विश्वास होता.

संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली आहे. घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक बाबींवरून त्यांनी कधीही कोणाचीही अवहेलना केलेली नाही.

हे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे की, ‘बिग बॉस’च्या नियमानुसार आणि कायदेशीर करारानुसार, स्पर्धकांना घराबाहेरील वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे किंवा त्यावरून कोणाला लक्ष्य करणे सक्त मनाई आहे. अशा प्रकारचे उल्लंघन झाल्यास गंभीर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शोमधून बाहेर काढण्याचाही समावेश आहे.

तथापि, विशाल कोटियन यांनी हा नियम वारंवार मोडला आहे. शोच्या सुरुवातीपासूनच हे सुरू असून, यावेळी विशाल यांनी केलेला प्रकार सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला आहे. हा शोच्या आचारसंहितेचा गंभीर आणि अस्वीकार्य भंग आहे.

याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार केवळ शाब्दिक चिथावणीपुरता मर्यादित नव्हता. हेतुपूर्वक शारीरिक चिथावणी देण्यात आली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या आणि परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली, जे नियमांचे आणखी एक मोठे उल्लंघन आहे. शोमध्ये शारीरिक आक्रमकतेविरुद्ध किरकोळ कारवाई करण्यात आली असल्याचे आम्ही पाहिले आहे; मात्र इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो गंभीर कायदेशीर भंग झाला आहे, तो अद्याप दुर्लक्षित राहिला आहे.

एक कुटुंब म्हणून आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत. त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

बिग बॉस मराठी, कलर्स आणि एंडेमॉलशाइन यांच्या प्रयन्नाचे आम्ही कौतुक करतो; मात्र महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांनी पाहिल्या जाणाऱ्या या लोकप्रिय शोची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य उदाहरण घालून द्यावे, अशी आमची विनंती आहे.

तसेच, शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी या सर्व उल्लंघनांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

राकेश यांनी नेहमी शांत सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान यांचे प्रतिनिधित्व केले आहे. आमचे कुटुंब, मित्र आणि चाहते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

दरम्यान, राकेश बापटची बहीण शीतल बापट यांनी या संपूर्ण प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी रितेश देशमुख, बिग बॉस आणि कलर्स मराठीकडे केली आहे. याशिवाय राकेशच्या चाहत्यांनी सुद्धा विशालला कठोर शिक्षा मिळायला पाहिजे, त्याला घराबाहेर काढा असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.