Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा सातव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने घरातील सर्व सदस्यांना एक खास गिफ्ट दिलं आणि यासाठी तो स्वत: सर्वांना भेटण्यासाठी घरात गेला होता. दर आठवड्याच्या वींकेडला रितेश देशमुख घरातील सर्व सदस्यांची भाऊच्या धक्क्यावर शाळा घेत असतो. मात्र, आजवर तो कधीच ‘बिग बॉस’च्या घरात आला नव्हता. आज पहिल्यांदाच अभिनेत्याने घरात एन्ट्री घेतली होती. रितेशला मुख्य प्रवेशद्वारावर पाहताच सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त करत त्याला मिठ्या मारल्या. मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने त्याचं सर्वांनी स्वागत केलं.

‘बिग बॉस’ म्हणाले, “रितेश एखादी नवीन व्यक्ती जेव्हा या घरात येते…तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीचं मी स्वागत करतो. पण, आपल्याच घरात मी आपलं काय स्वागत करू? रितेश घर आपलंच आहे आणि मला खात्री आहे…रितेश आहे म्हणजे कल्ला होणारच!” यानंतर अभिनेत्याने घरातील सर्व सदस्यांना घर दाखवण्यास सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : प्रवास संपला! वैभव झाला Eliminate; जान्हवी-अरबाजला अश्रू अनावर, जाताना दोघांनाही दिली खास पॉवर, जाणून घ्या…

रितेशला सर्व सदस्य मिळून घर दाखवतात. धनंजय लिव्हिंग एरियाकडे बोट दाखवून म्हणतो, “हा तो एरिया जिथे आमचा दर आठवड्याला बाजार उठतो” यानंतर रितेश किचन परिसरात जातो. वैभवने नव्या फ्रिजबद्दल सांगताच अभिनेत्याने फ्रिज उघडून सर्वप्रथम “कोथिंबीर कुठे आहे” असं सर्वांना विचारलं.

Bigg Boss Marathi : रितेशने पाहिली कोथिंबीर ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

सदस्यांनी रितेशला दाखवलं ‘बिग बॉस’चं घर

गेल्या आठवड्यात कोथिंबीर ताजी आहे की, खराब आहे यावरूनच निक्की-वर्षा यांच्यात वाद झाला होता. घरातील अन्य सदस्यांनी देखील कोथिंबीर ताजी होती…वर्षा यांना ओळखता नाही. ही गोष्ट रितेशसमोर भाऊच्या धक्क्यावर मान्य केली होती. त्यामुळे घरात आल्यावर, ज्या कोथिंबीरमुळे एवढे वाद झाले ती खरंच ताजी आहे की खराब झालीये? हे पाहण्यासाठी रितेशने फ्रिजमधली कोथिंबीर दाखवण्यास सांगितली. फ्रिजमधून बाहेर काढलेली कोथिंबीर दाखवत धनंजय म्हणाला, “बघा सर ही कोथिंबीर अजूनही हिरवी आहे.” यावर वर्षा-निक्कीचा वाद आठवून सगळेच सदस्य खळखळून हसले.

Bigg Boss Marathi : रितेशने पाहिला घरातील पिकनिक स्पॉट ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

शेवटी, रितेश देशमुखने सुद्धा ही कोथिंबीर वापरू शकतो हे मान्य केलं आणि वर्षा यांना देखील याबद्दल सांगितलं. पुढे, रितेश आवर्जून ‘टीम बी’चा पिकनिक स्पॉट पाहण्यासाठी गेला. “पिकनिक स्पॉट आता डिस्कशन स्पॉट झाला” असल्याचं पॅडीने यावेळी सांगितलं. तर, धनंजय “आमच्या ग्रुपमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर” असं रितेशला म्हणाला.

दरम्यान, संपूर्ण घर पाहिल्यावर रितेशने सर्वांना त्यांच्या कुटुंबीयांचे व्हिडीओ दाखवले. यामुळे घरातलं वातावरण भावुक झालं होतं. यानंतर वैभवची एलिमिनेशन प्रक्रिया होऊन या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला.