Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच दुसरा भाऊचा धक्का पार पडला आहे. या आठवड्यात रितेश कोणाची शाळा घेणार? याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या आठवड्यात घरात अनुश्रीने जो काही गोंधळ घातला होता, यावरून तिला रितेश भाऊच्या धक्क्यावर चांगलाच जाब विचारला जाणार याचा प्रेक्षकांना आधीच अंदाज होता, आणि हा अंदाज खरा ठरला आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.

रितेशने भाऊच्या धक्क्यावर सर्वप्रथम अनुश्रीची शाळा घेतली आहे. बीबी राशन टास्कदरम्यान अनुश्री व प्राजक्ता या दोघींमध्ये वाद झाले होते. यावेळी अनुश्रीने शिवीगाळ केली होती. ही गोष्ट प्राजक्ताने तिच्या ग्रुपमधील सदस्यांना सांगितली. पुढे, दिपाली सय्यद याचा जाब विचारण्यासाठी अनुश्रीजवळ आली. यावर अनुश्री म्हणाली होती, “आईला घेऊन आली होती…आता पप्पांना घेऊन ये!” हे वाक्य सर्वांनाच खटकलं होतं. यावरूनच रितेशने अनुश्रीचा समाचार घेतला आहे.

रितेश देशमुख म्हणाला, “अनुश्री मला सांगा जेव्हा प्राजक्ता दिपालीला घेऊन आल्या, तेव्हा तुम्ही काय म्हणालात? आईला घेऊन आलीस…जा आता बाबांना घेऊन ये!” यानंतर अनुश्री काहीशी हसली ते पाहून रितेशचा पारा चांगलाच चढला.

तो थेट अनुश्री म्हणाला, “ए…लक्ष इथे! तिने भावाला आणलंय…सांगा आता काय सांगायचंय? हे ‘बिग बॉस’चं घर आहे इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचं.”

रितेशचा राग पाहून अनुश्रीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “किती आतुरतेने आम्ही या गोष्टीची वाट पाहत होतो”, “समजली का लायकी आपली”, “भाऊ आला…मस्तच झापलंय”, “एक नंबर भाऊ याची गरज होती”, “रितेश सर एकदम बरोबर रिप्लाय दिला हिला”, “असंच पाहिजे या अनुश्रीला” अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, रितेश देशमुखचा हा भाऊचा धक्का प्रेक्षकांना कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.