Bigg Boss Marathi Sangram Chougule Wild Card : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले ठरला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्याने घरात एन्ट्री घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाइल्ड कार्ड म्हणून कोण घरात येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर संग्रामच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रितेश देशमुखने संग्रामची ओळख करून दिल्यावर त्याला मंचावर टॉप-५ स्पर्धक कोण असतील असा प्रश्न विचारला. यावर या नव्या वाइल्ड कार्ड सदस्याने अनुक्रमे अभिजीत, निक्की, सूरज, अरबाज आणि जान्हवी यांची नावं घेतली. नेटकऱ्यांना संग्रामने सांगितलेलं रँकिंग काही पटलं नाही. मात्र, घरात एन्ट्री घेण्यापूर्वी संग्रामने “हे माझ्यामते असलेलं रँकिंग आहे पण, मी घरात गेल्यावर परिस्थिती बदलेल आणि मी नक्की टॉप-३ मध्ये येईन” असा विश्वास व्यक्त केला.
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात आला संग्राम
आजच्या ( ९ सप्टेंबर ) भागात संग्राम घरात एन्ट्री घेणार असल्याचं पाहायला मिळेल. मुख्य प्रवेशद्वाराने तो आत येणार आहे. प्रथम संग्रामने घराचा उंबरठा ओलांडताना तो खाली वाकून पाया पडला आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय…” म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. यानंतर आर्या चांगलीच लाजली. जान्हवी ‘बिग बॉस’ला “सकाळपासून ही ( आर्या ) वाइल्ड कार्ड एन्ट्रीची वाट पाहतेय बिग बॉस…” असं म्हणत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. संग्रामला पाहताच आर्याने डोळ्यांवर हात ठेवल्याचं प्रोमोत दिसत आहे.
संग्राम यानंतर म्हणतो, “तू आतापर्यंत जी काही पॉवर दाखवलीस ती वीक माणसांना दाखवली आहेस…तुला आता भेटेल फुल ऑन” हे बोलताना त्याचा रोख निक्की-अरबाजकडे होता. दोघांचेही चेहरे या नव्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीला पाहून उतरले होते. आता घराचं समीकरण कसं बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.