Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात जबरदस्त राड्याने झाली आहे. पण भाऊच्या धक्क्यावर झालेल्या एका गोष्टीमुळे अभिजीत सावंतच्या गटात धुसपूस होताना दिसत आहे. अंकिता प्रभू वालावलकर, पंढरीनाथ कांबळे आणि धनंजय पोवार अजूनही अभिजीतवर डाउट घेत आहेत. कालच्या भागात तिघजण अभिजीतविषयी गॉसिप करताना दिसले. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

रविवारी रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर अभिजीत सावंतने निक्की तांबोळीला ‘खिलाडी’ टॅग दिला. बिग बॉसचा खेळ तिला व्यवस्थितरित्या समजल्यामुळे अभिजीतने निक्कीला ‘खिलाडी’ टॅग दिल्याचं स्पष्ट केलं. हेच अभिजीतच्या गटातील काही लोकांना खटकलं आहे. यावरूनच अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजय अभिजीतबद्दल गॉसिप करताना दिसले.

हेही वाचा – ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्वा’ मालिकेत झळकणार ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री, प्रोमो शेअर करत म्हणाली…

जेव्हा अभिजीत अरबाज आणि वैभवबरोबर बोलत होता. तेव्हाच त्याच्यामागून अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजय गॉसिप करताना पाहायला मिळाले. अंकिता म्हणाली, “निक्कीला त्याने पहिल्यांदा ‘खिलाडी’ टॅग दिला होता. आपलंच नाणं खोटं म्हटल्यानंतर काय बोलणार.” त्यानंतर धनंजय म्हणाला, “त्याला थोडातर डोक्याचा भाग पाहिजे. आताच वाजलं. अंकिताला टॅग देना. पहिली कॅप्टन झाली आहे. ‘खिलाडी’ म्हणून कोणीही स्वीकारलं असतं. पण त्याच्यात तुला पाय कशाला घालायचा आहे?” त्यावर पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “तरीपण त्याला ते जपायचं आहे.”

मग धनंजय पंढरीनाथला विचारतो, “तुमच्या मनात अजून डाउट आहे?” यावर पॅडी म्हणाला की, हो. हिला बोललो होतो. अंकिता म्हणाली, “तो एक मोठा शो जिंकून आलाय त्याच्या आतामध्ये ती इनसिक्युरिटी आहे की, त्याला इथून जिंकून जायचं आहे किंवा पुढे यायचं आहे. इतक्या वर्षांनी त्याला संधी मिळाली आहे.” हे ऐकून धनंजय म्हणाला, “तो बोलला होता. हिंदीचे वगैरे शो येऊन गेले. मग तू इथे का आलाय?” यावर पंढरीनाथ म्हणाला, “तिकडे खूप अवघड असेल. इकडे त्याच्या तोडीने वीक लोक असतील, असं आहे. कारण रात्री त्याने सपशेल नाही म्हणून सांगितलंय.” यावर होकार देत धनंजय म्हणाला, “१०० टक्के मी या गटात आहे. तुम्हाला जे मनात वाटतंय ते मनामध्ये ठेऊ नका, असं तो म्हणाला आहे.” तेव्हा पंढरीनाथ म्हणाला, “मी परवा रात्री त्याला जान्हवीशी बोलताना पाहिलं. त्यानंतर मी विचारल्यावर तो सपशेल नाही म्हणाला. मी कुठे बोलत होतो, असं म्हणाला. त्याला आपल्याच गटात खोटं पाडल्यासारखं झालं असतं. फक्त डोक्यात ठेऊ. त्याच्यासमोर वाच्यता नको.”

अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजयच्या या गॉसिपवर अभिजीने सोशल मीडियाद्वारे उत्तर दिलं आहे. “ढोंगिपणाचा खरा अर्थ”, असं लिहित अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजयच्या गॉसिपचा व्हिडीओ शेअर केला आहे. “दुसऱ्यांची चूक दाखवणारे स्वतःचं सत्य विसरतात”, असं त्याने कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, या आठवड्यातही योगिता चव्हाण, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे सहा स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहे. अशातच योगिता सातत्याने घराबाहेर होण्यासाठी विनंती करत आहे. त्यामुळे आता या सहा स्पर्धकांपैकी कोण तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर होतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.