Bigg Boss Marathi Season 5 : काही दिवसांपूर्वी झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'मुळे 'ए टीम'मधील समीरकरणं पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. ‘भाऊच्या चक्रव्यूह' रुममधून अरबाज, जान्हवी आणि वैभवची चुगली निक्कीला ऐकवल्यानंतर 'ए टीम'मध्ये फूट पडली. निक्कीने 'ए टीम' सोडली आणि ती त्यांच्या विरोधात खेळू लागली. एवढंच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी ‘ए टीम’मधील कुठल्याही सदस्याच्या हाती लागू देणार नाही, असा पवित्रा निक्कीने घेतला. त्यामुळे निक्की विरुद्ध 'ए टीम' असं चित्र निर्माण झालं आहे. जान्हवी आणि वैभव स्वतंत्र खेळताना दिसत आहेत. अशातच 'ए टीम'मध्ये फूट पडल्यामुळे अरबाजचे वडील चिंतेत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत त्यांनी स्वतः नुकत्याच एका मुलाखतीमधून खुलासा केला आहे. अरबाज पटेलच्या वडिलांनी नुकतीच ‘७ स्टार मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अरबाजच्या एकंदरीत खेळाविषयी सांगितलं. तसंच त्याला काही मोलाचे सल्ले देखील दिले. मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांना विचारलं की, आता अरबाजच्या टीममध्ये फूट पडली आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर अरबाजच्या वडिलांनी चांगलंच उत्तर दिलं. हेही वाचा - “गर्वाची गोष्ट…” ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर मिळाल्यानंतर अरबाजच्या बाबांची होती ‘ही’ प्रतिक्रिया, मुलाच्या खेळाविषयी म्हणाले, “त्याने एकट्याने…” अरबाजचे वडील म्हणाले, "'ए' टीम तुटल्यामुळे मला खूप चिंता झाली आहे. कारण ती टीम खूप चांगली होती. टीममधील सदस्यांबद्दल बोलायचं झालं वैभवने अरबाजला भावासारखं प्रेम दिलं आहे. वैभवने अरबाजमुळे गद्दारीचा टॅग स्वतःवर लावून घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे. या जमान्यात एवढं कोणीही स्वतःवर असा टॅग लावू घेत नाही. पण वैभवने ते केलं याचा मला अभिमान आहे. वैभव अरबाजला भावासारखा जीव लावतो." पुढे अरबाजचे वडील म्हणाले, "जान्हवीबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं भावा-बहिणीसारखं प्रेम आहे. मला असं वाटतं, आताही ती अरबाजबरोबर खूप चांगली वागते. त्यांचं चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे अरबाजचं वैभव आणि जान्हवीबरोबर बॉन्डिंग चांगलं राहिलं पाहिजे, असं मला वाटतं." हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला : जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार, एजेने बनवली बाप्पाची सुबक मूर्ती दरम्यान, या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.