Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्याच दिवसापासून गाजू लागला आहे. अगदी पहिल्याच दिवशी घरात वर्षा उसगांवकर अन् निक्की तांबोळी यांच्या वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. दोघींमधले वाद थांबता थांबत नाहीयेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात वर्षा अन् निक्की यांच्यात टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. निक्कीने तर पार वर्षा उसगांवकरांची अक्कल काढली त्यामुळे आता सोशल मीडियासह मराठी कलाकारांच्या यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात यावेळी प्रत्येक गोष्ट स्पर्धकांना बीबी करन्सी खर्च करून विकत घ्यावी लागणार आहे. बेड खरेदी न केल्याने 'बिग बॉस'ने सर्व स्पर्धकांना जमिनीवर झोपावं लागेल असे आदेश दिले. तसेच घरात दिवसभरात कोणीही बेडचा वापर करू नये असं सांगण्यात आलं होतं. तरीही काही स्पर्धकांकडून या नियमाचा भंग झाल्याने 'बिग बॉस'ने आता शिक्षा म्हणून संपूर्ण आठवडाभर बेडचा वापर करायचा नाही अशी शिक्षा घरातील सदस्यांना दिली आहे. यानंतर वर्षा "चूक झाली 'बिग बॉस'" असं म्हणतात. तेव्हा निक्की त्यांना रागात "तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय…" असं म्हणत प्रचंड भडकते. पुढे भांडताना ती वर्षा उसगांवकरांची पार अक्कल काढते. "तुम्ही बाहेर खूप मोठ्या आहात पण, घरात सगळे सारखे आहेत" असं ती त्यांना म्हणते. यानंतर घरातले स्पर्धक या दोघींमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, दोघीही कोणाचंच ऐकत नाहीत. हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! दोघींनाही अश्रू अनावर, नेमकं काय घडलं? वर्षा उसगांवकर देखील निक्कीला तिच्या भाषेवरून सुनावतात. दोघींमधले वाद वाढत जाऊन शेवटी वर्षा अन् निक्की रडल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळालं. वर्षा उसगांवकर या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचा घरात एवढा अपमान होणं चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांसह काही कलाकारांनी दिल्या आहेत. तर, 'बिग बॉस मराठी'च्या आधीच्या पर्वात सहभागी झालेला अभिनेता उत्कर्ष शिंदेने यावर मोजक्या शब्दांत टिप्पणी केली आहे. मराठी अभिनेत्याची पोस्ट उत्कर्ष शिंदेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वर्षा व निक्की यांचा फोटो शेअर करत "आलिया भोगासी असावे सादर" अशी टिप्पणी केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता लवकरच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. यावेळी सुद्धा निक्की आणि वर्षा यांच्या वाद झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट! सदस्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला, पाहा प्रोमो Bigg Boss Marathi : उत्कर्ष शिंदेची पोस्ट https://www.instagram.com/reel/C-CmNc1Sqvl/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा नव्या सीझनचं प्रसारण दररोज रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी' वाहिनीवर करण्यात येतं. तर, प्रेक्षक हा शो जिओ सिनेमावर देखील महिन्याला २९ रुपये भरून पाहू शकतात.