Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील जान्हवी किल्लेकरची सध्या अधिक चर्चा सुरू आहे. २० ऑगस्टच्या भागात जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केल्यामुळे मराठी कलाकार भडकले आहेत. याआधीही जान्हवीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा पंढरीनाथ कांबळेचा अपमान करून जान्हवीने पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करून जान्हवीच्या वर्तणुकीचा निषेध नोंदवला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील याप्रकरणावर मार्मिक पोस्ट करत जान्हवीला चांगलंच सुनावलं आहे.
आतापर्यंत अभिनेत्री सुरेखा कुडची, विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, मेघा धाडे अशा काही कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करत जान्हवी किल्लेकरवर टीका केली. जान्हवी पंढरीनाथ कांबळेचा अपमान करत म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत.” त्यानंतर आर्या पंढरीनाथचा अपमान केल्यामुळे जाब विचारायला तिच्याजवळ गेली. पण तेव्हा देखील जान्हवी नीट बोलली नाही. “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही,” असं म्हणाली. तिच्या याच वर्तणुकीवर मराठी कलाकार भडकले आहेत.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे सिद्धार्थ जाधव देखील संतापला. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, “…जोकर”…बरं मग…ओव्हर अॅक्टिंग…बरं मग..पण या ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या जोकरचा “संयम” दिसत नाही का तुला?…एकदा का तो सुटला की तुझी बिग बॉस मराठी मधली ओव्हर अॅक्टिंग वाली जोकरगिरी पण दिसणार नाही…याला म्हणतात “अनुभव” तुझ्यासारखी कितीही (जा)नवी लोकं आली ना…तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव…जुनं तेच सोनं…आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणार आहे.
सिद्धार्थने ही स्टोरी शेअर करत ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘कहता है जोकर सारा जमाना’ हे गाणं मागे लावलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं असून ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
दरम्यान, पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यावरून नेटकरी देखील जान्हवीला ट्रोल करत आहेत. “हिचा माज उतरलाच पाहिजे”, “अरे ही बावळट, काही झालं की लोकांच्या करिअरवर येतेय, आधी वर्षा ताई आणि आता पॅडी दादा. हिची लायकी नाही खरंच”, “महेश मांजरेकर सर पाहिजे होते”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ( Bigg Boss Marathi )
© IE Online Media Services (P) Ltd