Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे संग्रामच्या एन्ट्रीने घरातील वातावरण बदलेलं पाहायला मिळत आहे. अशातच संग्रामबरोबर सूरज चव्हाण गेम प्लॅन करताना दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोमवारी (९ सप्टेंबर) संग्राम चौगुलेची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री झाली. यावेळी एक टास्क देण्यात आला. संग्राम चौगुलेला न आवडलेल्या सदस्यांना विहिरीत ढकलण्याचा टास्क होता. ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार ते सदस्य आठवडाभर बेड वापरून शकणार नाहीत. शिवाय ते सदस्य जेवणासाठी केवळ उकडलेले पदार्थ खाऊ शकतात. तसंच ज्या सदस्यांना संग्राम विहिरीत ढकलणार नाही; ते सर्व सोयी-सुविधा वापरू शकतात. जोडीमधील एका सदस्याला ढकलणं बंधनकारक होतं. यावेळी संग्रामने अरबाज, वैभव, आर्या, अंकिता, निक्की, धनंजय यांना पाण्यात ढकललं. यादरम्यान संग्राम व निक्कीमध्ये वाद झाला. या टास्कनंतर संग्राम ‘बी टीम’बरोबर खेळणार असल्याचं म्हटलं जातं आहेत. नुकताच संग्राम व सूरजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सूरज संग्रामबरोबर गेम प्लॅन करताना पाहायला मिळत आहे.
‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सूरज संग्रामला म्हणतो की, आपण यांना गेममध्ये हलवून टाकू या. त्यानंतर संग्राम म्हणतो, “कशाला हलवून टाकायचं कोणाला?” तेव्हा सूरज म्हणतो की, हादरले पाहिजे. पुढे संग्राम म्हणतो, “ज्या दिवशी जे असेल ते करायचं. कोणाला हलवायचं नाही. कोणाला काय करायचं नाही.” यावर सूरज म्हणाला, “मी त्याच टाइमचं म्हणतोय.”
त्यानंतर संग्राम सूरजला समजवतो की, आपल्याकडून चुका होणार नाही हे बघायचं. यावेळी सूरज म्हणतो, “माझ्याकडून चुका होतं नाहीत. मी आधी विचारतो बरोबर आहे की नाही? आता तुला पण विचारणार हे बरोबर आहे की नाही.” त्यावर संग्राम म्हणाला, “मी पण सगळं विचारणारचं ना.” पुढे सूरज म्हणाला, “पण तुला सगळं समजतं भाऊ. तुला नॉलेज आहे. मी कॉलेज नाही केलं म्हणून नॉलेज नाहीये. मी शिकलो असतो तर बुद्धी फास्ट चालली असती.” यावर संग्राम म्हणतो, “बुद्धी चालायला शिकायची गरज नसते. रोजच्या रोज आपण जे करतोय ना ते ऐकलं तरी आपण खूप त्यातून शिकतो.”
हेही वाचा – Video: गणपतीच्या नैवेद्यावरून चारुलताबरोबर अधिपतीचा वाद, म्हणाला, “आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली परंपरा…”
दरम्यान, संग्राम व सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सूरज हलवून नाही…हादरुन टाक. संग्राम तुझा अर्जुन म्हणून आलाय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सूरज भावा तू मस्त झोपून जरी राहिला तरी आम्ही तुझे चाहते तुला ट्रॉफी जिंकून देऊ विषय संपला.”