Bigg Boss Marathi Season 5 : रविवारी ( १५ सप्टेंबर ) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर धमाल, मस्ती झाली. तसंच रितेश देशमुखने घरातील सर्व सदस्यांना एक मोठं सरप्राइज दिलं. सदस्यांच्या कुटुंबियांचे व्हिडीओ रितेशने दाखवले. यामुळे सर्व सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर नॉमिनेट असलेल्या सदस्यांमधून घराबाहेर होणाऱ्या सदस्याचं नाव जाहीर केलं.

निक्की, अंकिता आणि वैभव चव्हाण हे तीन सदस्य अनसेफ होते. यातील निक्की, अंकिता सेफ झाल्या आणि वैभव एलिमिनेट झाला. हे ऐकताच अरबाज आणि जान्हवी ढसाढसा रडू लागले. एवढंच नाहीतर अरबाजने वैभवला अजून एक संधी देण्याची मागणी रितेशकडे केली. पण तसं काही झालं आहे. वैभव ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाला. जाताना मॅच्युअल फंडचा कॉइन अरबाज आणि जान्हवी देऊन गेला. त्यामुळे सध्या वैभव चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभव विविध एंटरटेनमेंट चॅनलशी तो संवाद साधताना दिसत आहे. याच वेळी त्याने अरबाजबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.

‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट चॅनलशी नुकताच वैभव चव्हाणने संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं की, अरबाज हा सतत पलटताना दिसला आहे. त्यामुळे तू घरातून निघताना अरबाज रडला ते खरं होतं का? तुला काय वाटतं? यावर वैभव म्हणाला, “मला माहित नाही त्याचं रडणं खरं होतं की नाही. पण नक्की मी माझ्या परीने प्रयत्न करत होतो की, मैत्री टिकून राहावी. पण जितकं मला दिसत होतं की तो प्राधान्य मला देत नाहीये, बाकीच्यांना देतोय किंवा मी जेवढा प्रयत्न करतोय तेवढं त्याच्याकडून होतं नव्हतं. माहिती नाही नेमकं काय आहे.”

हेही वाचा – “माझा ग्रुप चुकला”, ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाणने मान्य केली स्वतःची चूक, म्हणाला, “मी तळ्यात मळ्यात…”

पुढे वैभव चव्हाण म्हणाला, “दोन-तीन आठवड्यापूर्वी बंधनाचा टास्क होता त्यावेळेस पण अचानक बाथरुममध्ये जाऊन त्याने निक्कीबरोबर गप्पा मारल्या. जे आम्हाला चक्रव्ह्यू रुममध्ये दाखवलं की असं घडलं. त्याच्यावरूनही मी त्याला भरपूर काही बोललो. ते दिसलं की नाही दिसलं ते मला माहिती नाही. पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी एक आठवडा त्याच्याबरोबर बोललो नाही. आमच्यात वादावाद झाले. पण माहित नाही काय खरं आहे. कारण तो गेम खेळून आलेला आहे. मला असं कुठे वाटतं नाही, मी गोष्टी घडवून आणल्या आहेत, मी खोट्या गोष्टी केल्या. हे मी माझं सांगू शकतो. बाकीच्यांच सांगू शकत नाही. कोणी काय केलं आणि कसं केलं? मी जाणूनबुजून कोणाला दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. जाणूनबुजून कुठल्या पलट्या मारल्या नाही. जाणूनबुजून कोणाला स्वतःहून भांडणं नाही केली. मला असं वाटतं समोरच्यांनी असं नाही केलं तरी मी कसा करू. हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे थोडंस मला वाटतंय, माझा स्वभाव मला नडला असेल. माहिती नाही कसं काय…त्याच्या पण डोक्यात काय आहे.”

हेही वाचा – Video: ऐश्वर्या राय बच्चनला मिळाला पुरस्कार, लेक होती सोबतीला; कधी किस करताना तर कधी फोटो काढताना दिसली आराध्या

दरम्यान, वैभव चव्हाण एलिमिनेट होण्याआधी आर्या जाधव घराबाहेर गेली. जादूई हिरा उचलण्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने रागाच्या भरात निक्कीला कानशिलात लगावली. त्यामुळे ‘बिग बॉस’ने लगेच तिला जेलमध्ये टाकलं आणि ‘भाऊच्या धक्क्या’वर कठोर शिक्षा करणार असल्याचं जाहीर केलं. त्याप्रमाणे शनिवारी ( १४ सप्टेंबर ) ‘भाऊच्या धक्क्या’वर ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा सुनावत थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला.