Bigg Boss Marathi 6 First Promo : ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन केव्हा सुरू होणार? याची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘बिग बॉस’ प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच या शोचा सहावा सीझन सर्वांच्या भेटीला येणार आहे. यंदाची थीम काय असेल? सहाव्या पर्वाचा होस्ट कोण असेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बिग बॉसच्या सहाव्या सीझनचा पहिला प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो नेमका कसा आहे पाहुयात…
‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्या ‘बिग बॉस मराठी’चं सहावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. पहिला प्रोमो समोर येताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसं असेल? यंदाचा गेमप्लॅन काय असणार? आणि बरंच काही… तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख करणार का? ‘भाऊचा कट्टा’ पुन्हा एकदा घराघरांत पाहायला मिळेल का? असे अनेक प्रश्न सध्या ‘बिग बॉस’ प्रेमींच्या मनात आहेत.
‘कलर्स मराठी’कडून सादर करण्यात आलेल्या पहिल्या टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला आहे तो म्हणजे ‘दरवाजा’. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित… दार उघडणार अन् नशिबाचा गेम पालटणार…अशीच काहीशी यंदाची थीम असेल.
‘बिग बॉस मराठी’चा हा सहावा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर पाहता येईल. सध्या या सीझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून हळुहळू प्रेक्षकांपर्यंत सर्व अपडेट्स येतील. सदस्यांची नावं, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचा सर्वात मोठा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमणार आहे.
