Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली असून, रविवार, ११ डिसेंबर रोजी शोचा भव्य ग्रँड प्रीमियर पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया, टीव्ही, सिनेमा आणि विविध क्षेत्रांतील चेहरे दाखल झाले आहेत. त्यापैकी सोशल मीडियावर रील स्टार म्हणून लोकप्रिय असलेला करण सोनावणे हाही ‘बिग बॉस’च्या घरात गेला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तो का गेलाय, याचं कारण समोर आलं आहे.

‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात करणनं दिमाखदार एन्ट्री करताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. रील स्टार म्हणून ओळख असलेला करण सोशल मीडियावर ‘फोकस इंडियन’ या नावानं लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या करणनं मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि अखेर तो आता ‘बिग बॉस’च्या घरातसुद्धा गेला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर त्याला सोशल मीडियावरील इतर इन्फ्ल्यूएन्सर्सकडून पाठिंबा मिळत आहे. त्याच्या ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील सर्व जण त्याला पाठिंबा देत आहेत. ‘बिग बॉस १९’ मधील प्रणित मोरेनंही त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात करण का गेलाय?, याबद्दल त्यानं प्रणितला सांगितलं होतं. याचा व्हिडीओ नुकताच करणच्या सोशल मीडियावरून विनोदी शेअर करण्यात आला आहे.

Award Banner

Bigg Boss Marathi 6 मध्ये जाण्याबद्दल करण सोनवणे म्हणाला…

या व्हिडीओमध्ये प्रणित करणला ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये गेल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि म्हणतो, “मला सांग तू ‘बिग बॉस मराठी’मध्ये का जात आहेस? मी गेलो. कारण- मला घरातले सतावत होते. लग्न कर, लग्न कर, असं म्हणत होते. मन:शांतीसाठी मी ‘बिग बॉस’च्या घरात गेलो होतो. तुझं काय कारण आहे?”

मग करण त्याचं ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याचं कारण देत म्हणतो, “माझे मित्र… ते कायम माझ्या मागेच लागलेले असतात. त्यांना त्यांच्याबरोबर कायम मीच हवा असतो. नुसतं करण पाहिजे… करण पाहिजे, असं म्हणत असतात. फोन करून त्रास देत असतात. त्यामुळे मला वैताग आलाय, माझं काही आयुष्य आहे की नाही? त्यांना सतत मीच का हवा असतो. मी नसेन, तर ते माझ्या घरी जाऊन आई-वडिलांशी गप्पा मारतात. मी येईपर्यंत घरीच बसलेले असतात. असं नसतं ना… मी त्यांना सांगतो की, तुम्ही इतर मित्रांबरोबरसुद्धा वेळ घालावा ना… मला माझी स्पेस मिळायला नको का? एखाद्या नात्यात स्पेस हवी असते.”

त्यानंतर करण प्रणितकडे सात हजार रुपये मागतो आणि प्रणित त्याला लगेच ऑनलाइनद्वारे पैसे पाठवतोदेखील. पैसे पाठवल्यानंतर प्रणित त्याला पुन्हा कधी पैसे देणार, असं विचारतो. त्यावर करण त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, “तू आता माझ्या मित्रांसारखं वागू नकोस हा… तुला बोललो ना.. मला स्पेस हवी आहे. मित्रांसारखंच माझ्या मागे नको लागूस.” त्यानंतर करण तिथून निघून जातो. तेवढ्यात प्रणितलासुद्धा कळतं की, तो त्याच्याकडून उधारी घेऊन गेला आहे.