Riteish Deshmukh Announced Bigg Boss Marathi 6 On Air Date: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. कलर्स मराठीने बिग बॉस लवकरच येणार, अशी घोषणा केल्यानंतर या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा सहावा सीझन कधी येणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. बऱ्याच टीझरनंतर अखेर कलर्स मराठीने प्रोमो शेअर करून शो कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची तारीख जाहीर केली आहे.

बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिग बॉस मराठी ६ सुरू व्हायला एक महिनाही उरलेला नाही. कलर्स मराठीने बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो जाहीर केला आहे. यात रितेश देशमुख म्हणतो, ‘बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन वाजवला, आता सहावा सीझन गाजवायचाय.’ बिग बॉस मराठी ६ ११ जानेवारी २०२६ पासून रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन ६. नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय बिग बॉस मराठी सिझन ६. सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अजून गुलदस्त्यात आहे.

“आला रे आला, आपला भाऊ आला” या आवाजाने प्रोमोची सुरुवात होते. “आता सगळे होणार बेभान. रितेश भाऊ घेऊन येत आहेत महाराष्ट्राचं तुफान !! ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. पाहा बिग बॉस मराठी ६ कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर,” असं कॅप्शन देऊन कलर्स मराठीवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

पाहा बिग बॉस मराठी ६ चा प्रोमो

भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग… घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे हि असणार… पण, मी गप्प नाही बसणार…! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!

बिग बॉस मराठी ६ मध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा या सीझनमध्ये कोण-कोण असेल, याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, प्रोमो पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच स्पर्धकांच्या नावाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पण आणखी एक महिना वाट पाहावी लागेल, याबद्दल काही प्रेक्षकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.