Bigg Boss Marathi 6 Sonali Raut : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शो सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत आणि शोची रंगत हळूहळू वाढत चालली आहे. शोमधून आतापर्यंत दोघांची एक्झिट झाली आहे. गेल्या आठवड्यात राधा पाटीलनं निरोप घेतला. तर या आठवड्यात सोनाली राऊतची एक्झिट झाली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात दिपाली सय्यद, सोनाली राऊत, विशाल कोटियन, प्रभू शेळके, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, रूचिता जामदार आणि ओमकार राऊत हे स्पर्धक बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. या सदस्यांमधून सोनाली राऊतचा प्रवास संपला आहे. अशातच तिनं ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येण्याचं कारण सांगितलं आहे.

सोनाली राऊत ‘बिग बॉस’मधून बाहेर येण्याचं कारण तिची प्रकृती असल्याचं सांगितलं आहे. लोकसत्ताशी साधलेल्या संवादात सोनाली म्हणाली, “घरात गेल्या नंतर तिसऱ्या दिवशीच मला इन्फेक्शन झालं. आम्ही ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी सगळी तपासणी करून जातो. सगळे रिपोर्ट्ससुद्धा दिलेले असतात. पण त्या घरात जाताच मला स्कीन इन्फेक्शन झालं.

पुढे ती म्हणाली, “१७ जण एकत्र या घरात आले आहेत. त्यामुळे हायजीनचा प्रश्न आहे. त्यात मला ओ.सी.डी.सुद्धा आहे. १७ जणांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. सगळे एकमेकांचे टॉवेल्स वापरतात. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवली जात नाहीत. खाण्याचे पदार्थ स्वच्छतागृहात पडलेले असायचे. या सगळ्यामुळे मला हायजीनचा त्रास झाला.”

यानंतर सोनाली म्हणाली, “इन्फेक्शन झाल्याचं मला तीन दिवस आधी कळलं. डॉक्टरांनी मला बरं व्हायला दोन आठवडे लागतील असं सांगितलं. हे इन्फेक्शन होण्याचं कारण आहे हायजीन. त्यात जेवणाचासुद्धा मला त्रास झाला. त्या घरात ऊन नाहीये, एसी खूप जोरात चालतो. त्यात ब्रॉंझ रेशनकार्डमुळे आम्हाला जेवणाच्या सवलती नव्हत्या. तर घरातल्यांनी हायजीन न पाळल्याने मला इन्फेक्शन झालं. मला स्केबीज (Scabies) आजार झाला. यामुळे मला घराबाहेर यावं लागलं.”