Bigg Boss Marathi Fame Sonali Raut Talks About Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली राऊत. ‘बिग बॉस’च्या घरात नेहमी चर्चेत असणाऱ्या सोनालीने शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुखबद्दल सांगितलं आहे. सोनालीने ‘बिग बॉस’पूर्वी रितेश देशमुखबरोबर हिंदी चित्रपटात काम केलं असून ती त्यामध्ये त्याची सहअभिनेत्री होती. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सोनालीने रितेशबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना सोनालीने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या हिंदी चित्रपटात रितेश देशमुखबरोबर काम करताना तिला मज्जा आली असं म्हटलं.

रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली सोनाली राऊत?

रितेश देशमुखबरोबर चित्रपटात काम करताना कसा अनुभव आला याबद्दल विचारल्यानंतर सोनाली म्हणाली, “रितेश बरोबर मी ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये काम केलं आहे. तो खूप फ्रेंडली आहे. खूप चांगला आहे आणि इतरांना मदत करणारा आहे. सेटवर तर खूप मजा आली, इतरही कलाकार होते, मी रितेशचीच सहअभिनेत्री होते चित्रपटामध्ये. पण मला असं वाटतं की, बिग बॉसमध्ये मी त्याला वेगळ्या भूमिकेतून बघणार आहे. मी त्याला नेहमी मस्ती करताना पाहिलं, पण शोमध्ये तो खूप गंभीर भूमिकेत असणार आहे आणि मी तरी त्याला भाऊ म्हणणार नाहीये.”

निक्की तांबोळी व राखी सावंतबद्दल सोनाली राऊतची प्रतिक्रिया

सोनाली राऊतने या मुलाखतीत राखी सावंत व निक्की तांबोळी यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. सोनालीने यावेळी दोघींचं कौतुक करत दोघीही मनोरंजन करत असतात असं म्हटलं आहे. शिवाय ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये निक्कीने पूर्ण सीझन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व ती कायम चर्चेत राहिली असंही म्हटलं आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६मध्ये सोनाली राऊत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. करण सोनावणे, आयुष संजीव या स्पर्धकांबरोबर सोनाली राऊत अनेकदा ‘बिग बॉस’मधील गेमबद्दल व स्पर्धकांबद्दल बोलताना दिसते.