Bigg Boss Marathi 6:राखी सावंत ही विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत येते. तिची वक्तव्ये लक्ष वेधून घेतात. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती तिच्या बिनधास्त वागण्यासाठी ओळखली जाते.
राखी सावंत बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये विविध सीझनमध्ये सहभागी झाली. २००६ साली बिग बॉसचा पहिला सीझन आला होता. त्यामध्ये राखी सावंत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर बिग बॉसच्या १४ व्या व १५ व्या सीझनमध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाली होती. तसेच, ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातदेखील सहभागी झाली होती.
राखी सावंतबद्दल सोनाली राऊत म्हणाली…
आता राखी बिग बॉसच्या सहाव्या पर्वातदेखील सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सोनाली राऊतने दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले होते.
सोनाली राऊतने नवशक्तिला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “मला १०० टक्के खात्री आहे की, या वेळेसही राखी सावंत येणार आहे. कारण- मी तिला बोलताना कुठेतरी ऐकलं की मला बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा जायचं आहे. वाइल्ड कार्ड किंवा पाहुणे म्हणून मला जायचं आहे, असं राखी म्हणाली होती. त्यामुळे मला १०० टक्के खात्री आहे की, ती येऊ शकते.”
तुझं तिच्याबरोबर समीकरण कसं आहे यावर ती म्हणाली, “ती खूप चांगली आहे. कारण- जेव्हा मी बिग बॉसच्या आठव्या पर्वात गेली होते, त्या वेळी तिनं मला खूप पाठिंबा दिला होता. आम्ही खूप कार्यक्रम, शोज यामध्ये एकत्र असतो. ती मला भेटत राहते.”
पुढे राखीबद्दल सोनाली राऊत म्हणाली, “ती खूप एंटरटेनिंग आहे. ती खूप मजेशीर आहे”, असे म्हणत राखीचे कौतुक केले.
दरम्यान, सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विविध कारणांमुळे चर्चा सुरू आहे. अनुश्री, रुचिता व राकेश यांच्यामध्ये झालेल्या वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आता रितेश देशमुख या प्रकरणावर नेमके काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
