Suraj Chavan Suraj Chavan Became Father Welcome Baby Girl : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूरज चव्हाण बाबा झाला असून, ‘गुलीगत किंग’च्या घरी जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. सूरजला ४ सप्टेंबरला मुलगी झाली. सध्या सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस मराठी’मुळे सूरजला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरांत ओळख मिळाली. याशिवाय शोदरम्यान त्याने अनेक सहस्पर्धकांबरोबर आपुलकीची नाती जोडली. सूरज बाबा होणार असल्याची गुडन्यूज काही दिवसांपूर्वीच त्याची ‘बिग बॉस’पासून मानलेली बहीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर रिव्हिल केली होती. संजनाची चोरओटी भरल्याचा एक खास व्हिडीओ जान्हवीने शेअर केला होता. यानंतर संजनाचं डोहाळेजेवण सुद्धा थाटात पार पडलं होतं. आता जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, “आमच्या घरी राधा आलीये’ अशी प्रतिक्रिया संजनाने दिलेली आहे.

लेकीला पाहिल्यावर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने प्रेमाने आपल्या बायकोला जवळ घेतलं आणि तिची विचारपूस केली. यावेळी सुद्धा सूरजच्या चाहत्यांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सूरज-संजनाचा रुग्णालयातील हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

आता सूरज आपल्या लेकीचं नाव काय ठेवणार? याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी जन्माष्टमीच्या दिवशी चिमुकलीचं आगमन झाल्यामुळे तिचं नाव ‘राधा’ ठेव असंही सूरजला सुचवलं आहे. ‘गुलीगत किंग’ बाबा झाल्याने सध्या त्याच्या गावी आनंदाचं वातावरण आहे.

दरम्यान, लग्नानंतर वर्षभरातच अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सूरज चव्हाणचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. सूरजच्या पत्नीचं पूर्ण नाव संजना गोफणे असून, ती सूरजच्या चुलतमामांची मुलगी आहे. या दोघांचं लव्हमॅरेज आहे. सूरज-संजनाच्या लग्नासाठी सुद्दा बारामतीत चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या दोघांच्या लग्नाला व लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह काही राजकीय मान्यवर देखील उपस्थित होते. याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा ‘गुलीगत किंग’च्या लग्नात सहभागी झाले होते.