Bigg Boss Marathi Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन अभिनेत्री तन्वी कोलतेने जिंकला. शोमध्ये उत्तम टास्क खेळून तिने सर्वांची मनं जिंकून घेतली. पण, ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश घेण्याआधी तन्वी ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. सिंचनाच्या भूमिकेचा निरोप घेऊन तिने शोमध्ये एन्ट्री घेतली होती. खरंतर, चांगला टीआरपी असलेली लोकप्रिय मालिका एका नवोदित अभिनेत्रीने सोडणं ही खूप मोठी गोष्ट होती. तन्वीने या मालिकेत सिद्धूची बहीण आणि लक्ष्मी-श्रीनिवास यांची धाकटी सून असलेल्या सिंचनाची भूमिका साकाराली होती.
मालिका अर्ध्यावर सोडून ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेतल्यावर तन्वीला स्वत:ला सिद्ध करणं भाग होतं. हा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता, मालिका सोडण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दल तन्वीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
तन्वी कोलते म्हणाली, “हो! मालिका सोडण्याआधी मी खूप विचार केला होता. पण, यापूर्वीही मी सांगितलं होतं की, मला त्रासात राहिलेलं आवडत नाही. मग, मी एकटी राहिले तरीही मला चालेल. एका पॉइंटला माणसाची अशीच मनस्थिती होऊन जाते की, आपल्याला जास्त त्रास होतोय, त्यापेक्षा मग कामच नसलेलं बरं आहे. मी एकटी खूश आहे. एक मालिका सोडल्यावर लोक असा बोभाटा करतात की…ही अशी मालिका सोडते किंवा मग हिला काम कसं मिळणार, अर्थात हे सगळं प्रेशर माझ्यावर होतं. कारण, मी नवोदित अभिनेत्री…त्यात एवढी मोठी मालिका मी अचानक सोडणार म्हटल्यावर खरंच प्रेशर होतं. पण, मी कायम निगेटिव्ह पाहण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टींकडे पाहते.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी एखादी मालिका सोडली त्यावर लोक काय म्हणतील, त्यांची प्रतिक्रिया काय असेल हा विचार करण्यापेक्षा..ती मालिका सोडल्यावर मी पुढचा प्रोजेक्ट काय करू शकते. त्यातून मला काय मिळेल, त्याच्यातून मी कशी पुढे जाईन याचा मी विचार केला.”
“मी एक मालिका सोडून मग त्यानंतर ‘बिग बॉस’ शो स्वीकारला होता. आता ‘बिग बॉस’मध्ये मी किती आठवडे टिकेन हे मला अजिबात माहीत नव्हतं. व्होटिंग पॅटर्न काय आहे, बाहेर काय सुरूये त्यापेक्षाही… ही तन्वी नेमकी कोण आहे? हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं. पण, आता तसं नाहीये आता तन्वी कोलते कोण आहे हे लोकांना माहितीये. बरं मला याचीही कल्पना होती की, जर मी शोमधून २-४ आठवड्यांमध्ये बाहेर गेले तर लोक म्हणणार की, चांगली मालिका सुरू होती, ती मध्येच सोडली आणि बिग बॉसमध्येही काही केलं नाही. त्यामुळे शोमध्ये प्रत्येक दिवशी मी असाच विचार करायचे की, हा शोमधला माझा शेवटचा दिवस आहे इथून पुढे मी बाहेर पडणार आणि माझा संघर्ष सुरू होईल. त्यामुळे काही करून स्वत:ला सिद्ध करायचं हे मी ठरवलं होतं. ‘बिग बॉस’ जिंकले तरच माझं नाव होईल हे मला माहिती होतं. चला बाबा… पोरीने मालिका सोडली पण, नाव कमावलं! असं सगळेजण बोलतीय याची मला कल्पना होती.” असं तन्वीने सांगितलं.
“याच सगळ्या गोष्टी माझ्या मनात सुरू होत्या की, चुकून जरी बाहेर पडले तर माझं हसं होणार. पण, शेवटपर्यंत मी ठाम राहिले आणि या सगळ्यातून जे काही घडलं ते चांगलंच झालं.” अशा भावना तन्वी कोलतेने व्यक्त केल्या.
