Bollywood Actress Comeback After 25 Years : ९० च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ममता कुलकर्णी. अनेक गाजलेल्या बॉलीवूड सिनेमांमधून तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छुपा रुस्तम’ हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर तिनं २००२ मध्ये आलेल्या ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्राला कायमचा अलविदा केला. त्यानंतर आता २५ वर्षांनी ममता कुलकर्णी पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक करतेय.
विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ममता कुलकर्णी अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली आणि ती संन्यासी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. महाकुंभाच्या वेळी ती किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारताना दिसली. त्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर ममता कुलकर्णीनं या पदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचं इंडस्ट्रीतलं कमबॅक.
२५ वर्षांनी ममता कुलकर्णीचं कमबॅक
ममता कुलकर्णी लवकरच Laughter Chefs च्या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये अली गोनी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अंकिता लोखंडे, विक्की जैन आणि इतर कलाकारही असतील. या शोची होस्ट भारती सिंग आहे. नुकत्याच झालेल्या एका भागाच्या शूटिंगआधी ममतानं माध्यमांशी संवाद साधला आणि तिच्या कमबॅकबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय बऱ्याच काळानंतर टीव्हीवर येत असल्यानं आपण उत्साही अन् आनंदी असल्याचंही तिनं सांगितलं.
‘लाफ्टर शेफ्स’बद्दल ममता म्हणाली…
ममता कुलकर्णी म्हणाली, “मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. कारण- मी जवळपास २५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परत येत आहे. तुमच्या लक्षात असेल, तर मी माझ्या आयुष्याच्या गेल्या २५ वर्षांत टेलिव्हिजनवर काम केलं नाही. ही खूप चांगली संधी आहे, हसण्याची संधी… लोक खूप गंभीर झाले आहेत. सर्वांचं आयुष्य खूप गंभीर झालं आहे. मग स्वयंपाक करताना हसण्यापेक्षा चांगलं काय असू शकतं?” त्यानंतर अभिनेत्रीला या शोबद्दल विचारलं असता, ती म्हणाली, “मी या शोचे दोन-तीन भाग पाहिले आहेत.”
ममता कुलकर्णीची थोडक्यात माहिती..
ममता कुलकर्णीबद्दल अधिक सांगायचं झाल्यास, १९९१ साली तमीळ चित्रपट ‘नानबर्गल’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर १९९२ मध्ये ‘मेरा दिल तेरे लिये’ या हिंदी चित्रपटातून तिनं बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पुढे तिनं ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘आंदोलन’, ‘बाजी’, ‘चायना गेट’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं.
जानेवारी २०२५ मध्ये ममता कुलकर्णीनं संन्यास घेण्याची घोषणा केली. महाकुंभ मेळ्यात तिची किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी नियुक्ती झाली आणि तिनं ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ हे नाव स्वत:ला दिलं. त्यावेळी तिनं माध्यमांना सांगितलेलं की, आता पुन्हा चित्रपटांत काम करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.’ अशातच आता ती टीव्हीवरील शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
