आज आम्ही तुम्हाला एका अशा मालिकेबद्दल सांगणार आहोत, ज्यातील मुख्य तीन अभिनेत्रींपैकी दोघींनी आत्महत्या केली आणि एकीने इंडस्ट्री सोडली. या मालिकेचं नाव CATS असं होतं. यामध्ये नफिसा जोसेफ, कुलजीत रंधावा व मालिनी शर्मा या तिघी मुख्य भूमिकेत होत्या. या तीन प्रमुख अभिनेत्रींच्या आयुष्याचा ज्या प्रकारे शेवट झाला, त्यामुळे अनेकांनी या मालिकेला ‘शापित’ म्हटलं होतं.

‘CATS’ या शोची मुख्य अभिनेत्री नफिसा जोसेफ ही त्या शोमध्ये येण्यापूर्वी एक लोकप्रिय मॉडेल आणि व्हीजे होती. नफिसाने १९९७ मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती आणि त्याच वर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला होता. ती त्या स्पर्धेच्या टॉप १० पर्यंत पोहोचली होती. त्यावेळी, नफिसाला कायद्याचं शिक्षण घ्यायचं होतं. पण तिच्या नशिबात अभिनय होता. नफिसाला मॉडेलिंग व अभिनयाच्या ऑफर आल्या.

मिस इंडिया संपल्यानंतर लगेचच, नफिसाला एमटीव्ही इंडियाच्या व्हीजे हंटमध्ये परीक्षक म्हणून बोलावण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी तिलाच व्हीजे म्हणून कामावर ठेवलं. ज्या काळात मिनी माथूर, मारिया गोरेटी, सायरस ब्रोचा, मलायका अरोरा यांसारखे कलाकारही या म्युझिक चॅनलवर काम करत होते, त्याच काळात ती या चॅनलवर झळकली. तिने अनेक शो होस्ट केले आणि लोकप्रिय झाली.

नफिसाचे २६ व्या वर्षी झाले निधन

याच काळात नफिसाला अभिनयाच्या ऑफर मिळू लागल्या. ती सोनी टीव्हीच्या ‘CATS’ या मालिकेत झळकली. त्यावेळी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “जर ‘CATS’ मालिका यशस्वी झाली, तर मी नाटकाचा विचार करेन, कारण मी ऐकलंय की खरे कलाकार नाटक करून येतात.” CATS ही ३२ भागांची मालिका होती. जवळपास सात महिने ती प्रसारित झाली होती. CATS संपल्यावर ३ वर्षांनी नफिसाने मुंबईतील घरात आत्महत्या केली. नफिसाचा बिझनेसमन गौतम खंडुजाशी साखरपुडा झाला होता, एका महिन्याने त्यांचं लग्न होतं, पण त्यापूर्वीच तिने स्वतःला संपवलं.

Nafisa Joseph
नफिसा जोसेफ

नफिसाच्या मृत्यूने कुलजीतला बसला धक्का

नफिसाच्या मृत्यूने इंडस्ट्रीत सर्वांना धक्का बसला. नफिसा व CATS मधील तिची को-स्टार कुलजीत रंधावा बेस्ट फ्रेंड होत्या. कुलजीतने दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं होतं. ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेतून तिने करिअरची सुरुवात केली. ‘CATS’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर ती स्टार वनच्या ‘स्पेशल स्क्वॉड’ या मालिकेत झळकली. याच मालिकेत तिची भेट भानू उदयशी झाली आणि ते दोघे एकमेकांना डेट करू लागले.

कुलजीतनेही राहत्या घरी दिला जीव

‘स्पेशल स्क्वॉड’मध्ये कुलजीत मुख्य अभिनेत्री होती. पण निर्मात्यांनी तिच्या जागी गौरी प्रधानला आणलं आणि सहा भागांनंतर कुलजीतने मालिका सोडली. नंतर तिला सहारा वनच्या ‘कोहिनूर’ मालिकेत मुख्य भूमिका मिळाली, तिने पहिल्या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. नंतर कुलजीतने २००६ मध्ये अचानक ३० व्या वर्षी, मुंबईतील तिच्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी तिचा प्रियकर भानू उदय मुंबईत नव्हता आणि तो तिच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकला नव्हता. कुलजीतने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, त्यात आत्महत्येशी भानूचा काहीच संबंध नसल्याचं लिहिलं होतं.

मालिनी शर्माने इंडस्ट्री सोडली

CATS मध्ये नफिसा व कुलजीतबरोबर मालिनी शर्मा मुख्य भूमिकेत होती. मालिनी काही हिट गाण्यांमध्ये झळकली. तसेच विक्रम भट्टच्या ‘राज’ चित्रपटात तिने काम केलं. या सिनेमामुळे बिपाशा बसू आणि डिनो मोरिया रातोरात स्टार झाले होते. या चित्रपटात मालिनीची भूमिका छोटी होती.

Malini Sharma in CATS
मालिनी शर्मा (Photo: Express Archives)

याच काळात, मालिनीने ‘तुम बिन’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या अभिनेता प्रियांशू चॅटर्जीशी लग्न केलं होतं. दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. नंतर अचानक मालिनीने अचानक अभिनयाला रामराम ठोकला आणि पुन्हा कधीच ती रुपेरी पडद्यावर झळकली नाही.