Chahatt Khanna converted to Islam by choice : ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना हिने अलीकडेच तिच्या आयुष्यातील एका वादग्रस्त विषयावर भाष्य केले आहे. लग्नासाठी धर्मांतर केल्यानंतर पुन्हा सनातन धर्मात परतलेल्या चाहतने, धर्मांतराच्या निर्णयामागील सत्य सांगितले. चाहत खन्ना हिने दुसऱ्या लग्नापूर्वी धर्मांतर केलं होतं. आता तिने धर्मांतर आणि त्याभोवती असलेल्या गैरसमजांबद्दल तिचं मत मांडलं आहे. इस्लाम स्वीकारणं हा तिचा वैयक्तिक निर्णय होता, असं तिने म्हटलंय. चाहतने फरहान मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

शुभोजित घोष यांच्याशी बोलताना चाहतने स्पष्ट केलं की तिच्या बोलण्याचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो, ज्यामुळे दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरतात. “माझ्या वक्तव्यांचा नेहमीच चुकीचा अर्थ काढला जातो. आजही मी काही बोलले, तर त्यातील एखादं वाक्य उचललं जाईल आणि वेगळ्या संदर्भाने प्रसिद्ध केलं जाईल.”

मी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला होता – चाहत खन्ना

फरहान मिर्झाशी लग्न केलं, तेव्हा धर्मांतराचा निर्णय पूर्णपणे आपला असल्याचं चाहत खन्नाने सांगितलं. “मी एक अतिशय धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. माझं लग्न झालं असो वा नसो, मी दिवाळी जितक्या उत्साहात साजरी करते, तितक्याच उत्साहात ईदही साजरी करते. हो, मी माझ्या स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला होता. अनेकजण म्हणतात की माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला होता, पण मी असं कधीच म्हटलेलं नाही.”

“हो, माझा इस्लामवर विश्वास आहे आणि माझा सनातन धर्मावरही तितकाच विश्वास आहे. याचा अर्थ असा नाही की माझा इतर धर्मांवर विश्वास नाही. मी एक अतिशय धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे,” असं चाहत खन्ना म्हणाली. स्क्रीनने हे वृत्त दिलंय.

घटस्फोटानंतर चाहत खन्नावर झालेली टीका

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटांविषयी होणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळे मानसिक धक्का बसला, असं चाहतने सांगितलं. “मला खूप निराश आणि दु:खी वाटायचं, भीती वाटायची. मला वाटायचं की हे माझ्याबरोबर काय घडतंय? माझं नाव खराब होत आहे. काही लोकांनी तर मला असंही म्हटलं होतं की या सगळ्या गोष्टींमुळे मला काम मिळणार नाही.” मात्र, काळानुसार त्यांचा दृष्टिकोन बदलला.

“जशा गोष्टी घडत गेल्या, तसे माझे लोकांबाबतचे, आयुष्याबाबतचे आणि विविध गोष्टींबद्दलचे ज्ञान वाढत गेले. त्या ज्ञानामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आणि मग या गोष्टी मला खूप क्षुल्लक वाटू लागल्या,” असं चाहत खन्ना म्हणाली.

चाहत खन्ना यापूर्वी काय म्हणाली होती?

२०२४ मध्ये ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत चाहत खन्नाने धर्मांतर केल्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं होतं. आता ती पुन्हा सनातन धर्मात परतली असली, तरी इस्लाममधून तिला जे काही शिकायला मिळालं त्याचा आदर करत असल्याचं ती म्हणाली होती. “घटस्फोटानंतर मला माझ्या मूळ धर्मात परत येण्यासाठी बराच वेळ लागला. इस्लामवर विश्वास ठेवण्यासाठी मला ४-५ वर्षे लागली आणि अजूनही त्यांच्या काही मूळ तत्वांवर माझा विश्वास आहे. ती तत्वे खूप चांगली आहेत. पण सुदैवाने, जेव्हा मी पुन्हा माझ्या सनातन धर्माच्या मुळांकडे परतले, तेव्हा मला अनेक गोष्टींमागचे सत्य उमगले,” असं चाहत खन्ना म्हणाली.

तुझे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आले होते का? असं विचारल्यावर चाहत म्हणाली, “मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही, पण त्याकडे त्या नजरेतून पाहिलं जाऊ शकतं. ते नक्की काय होतं हे मला माहीत नाही, पण ‘हो’ ब्रेनवॉश झाले होते असं म्हणता येईल. म्हणूनच मी म्हणते की सुदैवाने मी पुन्हा माझ्या मूळ धर्मात परतलेय. मी धर्मांतर करावे अशी अनेकांची इच्छा नव्हती, पण मला निकाह करायचा होता म्हणून मी ते केलं. माझ्यावर धर्मांतरासाठी सक्ती करण्यात आली नव्हती, मी स्वतःहून ते केलं होतं. पण त्यानंतर मला नक्कीच असं सांगण्यात आलं होतं की, ‘तुझ्या देवांची पूजा करू नकोस, ते योग्य नाही’ आणि एका भरकटलेल्या मुलाप्रमाणे मी त्या मार्गावर चालत गेले. मला वाटतं ते ठीक होतं, इतकंही वाईट नव्हतं. पण आता मी आनंदी आहे, खूप चांगल्या स्थितीत आहे, मी त्यातून शिकले, समजूतदार झाले आणि मी काय करतेय हे मला ठाऊक आहे. काय बरोबर आणि काय चूक हे मला समजतंय आणि मी आता अतिशय सजग आयुष्य जगत आहे,” असं चाहत खन्ना म्हणाली.

चाहत खन्नाचे वैयक्तिक आयुष्य

चाहत खन्नाने२००६ मध्ये व्यावसायिक भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं, पण वर्षभरात तिचा घटस्फोट झाला. मग २०१३ मध्ये तिने फरहान मिर्झाशी लग्न केलं, पण २०१८ मध्ये तिने लैंगिक आणि मानसिक छळाचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. चाहत आणि फरहान यांना जोहार आणि दित्या नावाच्या दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचा सांभाळ चाहत करते.