‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला होता. मराठीतल्या दिग्गज कलाकारांपासून ते बॉलीवूडच्या सुपरस्टार्सपर्यंत अनेकांनी या शोमध्ये उपस्थिती लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान असे मोठमोठे स्टार्स आपले सिनेमे प्रमोट करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सहभागी व्हायचे. यादरम्यानचा एक खास किस्सा अभिनेता कुशल बद्रिकेने नुकत्याच दिलेल्या पॉडकास्टमध्ये सांगितला आहे.
कुशल बद्रिके ‘सर्व काही’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “एक काळ असा होता…जर तुम्हाला महाराष्ट्रात तुमचा सिनेमा पोहोचवायचा असेल तर ‘चला हवा येऊ द्या’शिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे बॉलीवूडचे अनेक आर्टिस्ट ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर येऊन गेले होते. या शोमुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर संवाद साधता आला, त्या सगळ्या कलाकारांना भेटता आलं. मग हळुहळू मला समजलं ते लोक पण आपल्यासारखेच आहेत. पण, शाहरुख जेव्हा पहिल्यांदा सेटवर आला होता…त्याचा काय रुबाब होता, काय सांगू मी तुम्हाला मला खरंच खूप जास्त भारी वाटलं होतं…खूप मजा आली होती. मी त्याला सुरुवातीला खिडकीतून लपत-लपत पाहिलं होतं. खरंच एक वेगळीच फिलिंग होती.”
कुशल पुढे म्हणाला, “याशिवाय ज्यावेळी सलमान खान आला होता त्यावेळी त्याच्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं की, ‘ते येतील आणि तासभर थांबतील. तुम्हाला जो काही कंटेट हवा आहे तो मिळून जाईल…प्रतिक्रिया सुद्धा देतील. पण, त्यांना शो नाही आवडला तर ते एक तास थांबून निघून जातील.’ यानंतर सलमानच्या माणसाला आम्ही विचारलं, ‘शो जर त्यांना खरंच आवडला तर?’ यावर तो म्हणाला होता, ‘मग आम्हाला काही कल्पना नाही!”
“पुढे, सलमान खानला शो इतका आवडला की, तो पाच तास आमच्या सेटवर होता. आमचं शूटिंग संपल्यावरही तो माणूस सेटवर थांबला होता. सलमानचं असं झालं…ही मुलं मनापासून काहीतरी करत आहे, ते सगळं त्याला खूप आवडलं.” असं कुशल बद्रिकेने सांगितलं.
दरम्यान, जवळपास दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर ‘चला हवा येऊ द्या’ या शोने २०२४ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. यानंतर या कार्यक्रमाचं नवीन पर्व २०२५ मध्ये एका नव्या अंदाजात सर्वांच्या भेटीला आलं होतं. पण, अवघ्या काही महिन्यातच हा दुसरा सीझन ऑफ एअर झाला. आता ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
