Dr. Nilesh Sabale Chala Hawa Yeu Dya show : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर जवळपास १० वर्षे अधिराज्य गाजवलं होतं. हा कार्यक्रम डॉ. निलेश साबळे होस्ट करत होता. मराठीसह बॉलीवूडचे अनेक स्टार कलाकार या शोमध्ये चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जायचे. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटामुळे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. यानंतर शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण असे बरेच कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते.
मात्र, या दहा वर्षांच्या प्रवासात, ‘चला हवा येऊ द्या’ बंद होण्यापूर्वी कोणत्या व्यक्तीने या शोमध्ये आलं पाहिजे होतं? यावर निलेश साबळेने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ बंद होण्यापूर्वी बच्चन साहेब म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन शोमध्ये आले असते तर, अजून मजा आली असती असं मत निलेशने व्यक्त केलं आहे.
निलेश साबळे म्हणाला, “या मंचावर बऱ्याच मोठ्या व्यक्ती येऊन गेल्या. आम्ही सगळे बच्चन साहेबांचे खूप मोठे फॅन्स होतो…त्यामुळे शो बंद होण्यापूर्वी बच्चन साहेबांनी एकदा तरी शोमध्ये आलं पाहिजे होतं असं मला वाटतं. अभिषेक बच्चन सेटवर आले होते…त्यावेळी त्यांनी बच्चन साहेबांचे बरेच किस्से सांगितले होते. याशिवाय सेटवर मामलेदार मिसळ वगैरे सुद्धा मागवली होती. मी तेव्हा एकही घास खाऊ शकलो नव्हतो इतकी ती मिसळ तिखट होती. पण, त्यांनी मनापासून मिसळ खाल्ली होती. तर, अमिताभ बच्चन साहेब सुद्धा शोमध्ये आले असते तर, नक्कीच मजा आली असती असं मला वाटतं.”
“मराठीतले असंख्य दिग्गज, ज्येष्ठ कलाकार या मंचावर येऊन गेले. त्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. ही सुद्धा आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.” अशा भावना निलेश साबळेने व्यक्त केल्या आहेत.
तो पुढे म्हणाला, “आता मी ‘फोन टीव्ही मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय कारण, युट्यूब हे महाराष्ट्राच्या घराघरांत पाहिलं जातं. खरंतर, आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स खूप उपलब्ध आहेत पण, त्याचं सबस्क्रिप्शन सगळेच विकत घेतील असं नाहीये. त्यातही आमचा शो अगदी महाराष्ट्राच्या खेडेगावात सुद्धा पाहिला जायचा. युट्यूब आता सर्वांकडे आहे आणि घराघरांत युट्यूबवरील विविध व्हिडीओ पाहिले जातात. बरं युट्यूब वापरणंही सोपं आहे. त्यामुळे या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी ‘फोन टीव्ही मराठी’ हे चॅनेल युट्यूबवर सुरू केलंय.”
