Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनने जवळपास दहा वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या शोची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात होती. दहा वर्षांनी पहिल्या सीझनची सांगता झाली आणि दुसरं पर्व २५ जुलै २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यानंतर शो फक्त ५ महिने सुरू होता. दुसरा सीझन संपल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. कमी टीआरपीच्या कारणास्तव हा शो संपला अशीही चर्चा सुरू होती.
याशिवाय दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षक डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या जुगलबंदीला सुद्धा मिस करत होते. या सगळ्यावर अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकत्याच दिलेल्या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. हे दुसरं पर्व लवकर का संपलं? यामागचं खरं कारण तिने यावेळी सांगितलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’चं दुसरं पर्व आता प्रेक्षकांच्या आलं तेव्हा तिच आधीची टीम का नव्हती? दुसरी गोष्ट म्हणजे..हा दुसरा भाग फार काळ चालला नाही. याचं कारण काय? असा प्रश्न श्रेयाला ‘मित्र म्हणे’च्या मुलाखतीत विचारण्यात आला.
याबाबत श्रेया बुगडे म्हणाली, “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा जेव्हा पहिला सीझन संपला…तेव्हाच टीमने असं ठरवलं होतं की, जेव्हा हा शो पुन्हा सुरू होईल तेव्हा…हा कार्यक्रम सीझन Based असेल. म्हणजे, पुन्हा कधीच हा शो सलग १० वर्षांसाठी सुरू राहणार नाही. तो सीझन स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल हे आधीच निश्चित केलं होतं. कारण, आता ट्रेंड्स बदलले आहेत. लोकांना पण नवनवीन गोष्टी बघायच्या आहेत…एक वाहिनी म्हणून त्यांच्या टीमलाही अनेक गोष्टी फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे हा सीझन लवकर संपला असं काही नाहीये. हा सीझन तेवढाच होता.”
‘चला हवा येऊ द्या २’मध्ये निलेश साबळे, भाऊ कदम का नव्हते?
“आता कलाकारांबद्दल सांगायचं झालं, तर त्यावेळी डॉक्टरचं ( निलेश साबळे ) चित्रपटाचं काम सुरू होतं. भाऊचं सुद्धा एका वेगळ्या चित्रपटासाठी शूट सुरू होतं. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दुसऱ्या भागासाठी जी फायनल टीम ठरली ती आमची होती. बाकी आम्हा सगळ्यांचं एकमेकांशी अजूनही तसंच बॉण्डिंग आहे. मी, भाऊ, कुशल, भारत दादा आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहोत.” असं श्रेयाने स्पष्ट केलं.
