Chandan Prabhakar on Kapil Sharma: ‘द कपिल शर्मा कॉमेडी’ या शोमधून अनेकांना लोकप्रियता मिळाली. त्यापैकी एक अभिनेता चंदन प्रभाकर हा आहे. चंदन शोमधील प्रमुख चेहरा नसला तरी विनोदाचं अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनय यांमुळे अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

चंदन प्रभाकरने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने त्याच्या आणि कपिल शर्माच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला.द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोसाठी चंदनची निवड झाली होती आणि कपिल शर्माची सुरुवातीला निवड झाली नव्हती. त्यावेळी त्याने आणि सहकारी कॉमेडियन राजीव ठाकूरने शोच्या निर्मात्यांकडे वारंवार कपिलला एक संधी द्यावी, अशी विनंती केली होती. कारण- कपिल टॅलेंटेड असूनही त्याला संधी मिळत नसल्याचे त्यांना वाटत होते.

अभिनेत्याने नुकतीच LPU DSW या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत चंदन म्हणाला, “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’साठी आम्ही ऑडिशन दिली. राजीव ठाकूर आणि माझी दोघांचीही निवड झाली होती; मात्र सुरुवातीला कपिल शर्माची निवड झाली नव्हती. त्या काळात आम्ही सगळे मित्र होतो आणि आजही आहोत. त्यामुळे आम्हाला वाईट वाटले. कपिलसारख्या इतक्या टॅलेंटेड माणसाची निवड का झाली नाही हा एकच प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.”

“तो खूप…”

चंदन आणि राजीव ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये सहभागी झाल्यानंतरही त्यांनी कपिलला शोमध्ये संधी मिळावी यासाठी निर्मात्यांकडे आग्रह धरला. चंदन म्हणाला, “आम्ही ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये सहभागी झालो. त्यानंतरही राजीव आणि मी असिस्टंट डायरेक्टर्सना सतत सांगायचो की, तुमच्याकडून चूक होतेय. टॅलेंट असलेल्या मुलाला तुम्ही संधी दिलेली नाही. त्यावर ते आम्हाला म्हणायचे, ‘तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या.’ पण, प्रत्येक वेळी रिहर्सलसाठी गेल्यावर आम्ही त्यांना पुन्हा सांगायचो की, तो खूप टॅलेंटेड मुलगा आहे. तुम्ही मोठी चूक करीत आहात.”

राजीव आणि चंदन यांच्या प्रयत्नांना यश येऊन, अखेर कपिल शर्माला त्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मात्र, त्याची जबरदस्त किंमत चंदनला मोजावी लागली. अभिनेता त्याबाबत म्हणाला, “निर्मात्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही कपिल शर्माला बोलावलं आहे; पण तुम्हाला शोमधून बाहेर पडावे लागेल. मी त्याचं कारण विचारल्यानंतर ते म्हणाले की, तुम्ही परत जाऊ शकता. कारण- कपिल शर्माला आम्ही शोमध्ये सहभागी करून घेत आहोत. त्यानंतर राजीव ठाकूर आणि कपिल शर्मा तिथेच राहिले; परंतु मला शोमधून बाहेर पडावं लागलं”, असे म्हणत कपिल शर्माला शोमध्ये घेतल्यानंतर त्याला शोमधून काढल्याची आठवण अभिनेत्याने सांगितली.

शोमधून बाहेर पडल्यानंतर चंदनने इंजिनियरिंगच्या क्षेत्रात काम केले. मात्र, काही काळानंतर त्याने पुन्हा मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता पुढे म्हणाला, “फार कमी लोकांना माहीत आहे की, मी खरं तर मेकॅनिकल इंजिनीयर आहे. मी एका सॉफ्टवेअर इंजिनियरिंग कंपनीत काम करायचो. पण, नंतर मला जाणवलं की मला हे करायचं नाही. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि अभिनय क्षेत्रात काम मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.”

दरम्यान, कपिल शर्मा आता लोकप्रिय अभिनेता आहे आणि सध्या तो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये काम करीत आहे.