Pankaj Vishnu on Fitness secrets: ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका २००१ मध्ये प्रदर्शित झाली होती. २०१३ पर्यंत ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होती. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग होता. मालिकेतील प्रत्येक पात्राला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. रवी देशमुख हे पात्रही या मालिकेतून लोकप्रिय ठरले होते. हे पात्र अभिनेते पंकज विष्णू यांनी साकारले होते.

पंकज विष्णू यांनी विविध मालिका, सिनेमांत काम केले आहे. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. ४४ वर्षीय अभिनेते त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसबद्दल वक्तव्य केले आहे.

“ती मनातून कायमच खूप तरुण राहते”

पंकज विष्णू म्हणाले, “देवाची कृपा आहे. पण, मला नेहमीच असं वाटतं की, आमची जी कलाकारांची जमात आहे, ती मनातून कायमच खूप तरुण राहते आणि राहण्याचा प्रयत्न करते आणि कदाचित ते बाह्य रूपावर दिसतं. मी फार असा काही विशेष प्रयत्न करीत नाही. आपण जे नेहमी करतो तेच म्हणजे तेलकट, गोड थोडं कमी खातो. नियमितपणे व्यायाम करतो, निदान आठवड्यातून तीनदा तरी जिमला जातो. असे साधेसुधे उपाय करतो. पण, देवाची कृपा आणि आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत.”

व्यायाम, डाएट या गोष्टी सातत्याने केल्या जातात. तर हे सातत्य कसं ठेवलं जातं? असे विचारले असता पंकज विष्णू म्हणाले, “आमची जी बॅच आहे, त्या आम्हा सगळ्यांना या क्षेत्रात जवळजवळ २५-३० वर्षं होतील. या क्षेत्रात टिकायचं असेल, तर मूलभूत फिटनेस, दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण- फक्त आपल्यासाठीच नाही, पण, आपले अनेक चाहते असतात, ते आपल्याला फॉलो करीत असतात. त्यांच्यासाठी आपण आदर्श राहायला हवं. मुळात स्वत:ला मेंटेन ठेवल्यामुळे स्वत:ला आनंद मिळतो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासह सगळी नटमंडळी मान्य करतील की ,आमचा अभिनयाचा काळ हा दीर्घकाळ असावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. २५-३० वर्षं या क्षेत्रात टिकणं ही खूप कठीण गोष्ट आहे.”

दरम्यान, पंकज विष्णू यांनी सूर्या, देवा श्री गणेशा, माझ्या नवऱ्याची बायको, मान सन्मान, अखंड सौभाग्यवती अशा अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच, त्यांनी मराठीसह हिंदी मालिकांतही काम केले आहे.