Namrata Pradhan on struggle: ‘छत्रीवाली’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नम्रता प्रधान सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या ‘गंगा माई की बेटिया’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीकडे कसे बघते, याबद्दल सांगितले आहे.

“माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काही गोष्टी घडल्या…”

नम्रता प्रधानने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला असं वाटतं की समजा जर आज मी एखादी गोष्ट करतेय, मग काहीतरी छान होईल किंवा गोष्टी ठीक होतील पण तसं होत नाही. तर माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा काही गोष्टी घडल्या, कठीण परिस्थिती होती. तर त्या परिस्थितीला सामोरे जाऊन उपाय शोधण्याचा माझा प्रयत्न असायचा.”

ती पुढे म्हणाली, “माझं माझ्या आई-वडिलांवर लहानपणापासून खूप प्रेम होतं. त्यामुळे, आपलं असं असतं ना की आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला सोडून आपण दुसरा विचार करतच नाही. आई-वडिलांबरोबरच काका, आजी, आत्या म्हणजे माझ्यासाठी कुटुंब माझं जग होती. मी माझ्या जबाबदाऱ्या सोडून माझ्या स्वप्नामागे धावण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मी कायम हाच विचार केला की माझं कुटुंब जर माझ्याबरोबर आहे तर माझ्या आयुष्यात जे आहे ते मला मिळेल.”

“मी एका दगडावर पाय ठेवून कधीच…”

ती असेही म्हणाली, “त्याचबरोबर माझ्या आवडी होत्या. गाणं, स्केटिंग, डान्स, मला गिटार वाजवायला आवडायचं. मी सगळ्या गोष्टी केल्यात. मी अर्धे-अर्धे क्लासेस केलेत. काही सोडलं नाही, मी कायम प्रयत्न करत राहिले. एक गोष्ट झाली नाही, तर दुसरी करायची दुसरी नसेल तर तिसरी करायची. काही लोक एका गोष्टीबरोबर अडकून पडतात की मला हेच करायचंय. पण माझा विचार असा कधीच नव्हता. मी एका दगडावर पाय ठेवून कधीच थांबले नाही. मी कायम पुढे जात राहिले. माझ्या आई-वडिलांमुळे, माझ्या कुटुंबामुळे माझी स्वप्नं बाजूला राहिली असं कधीच झालं नाही.”

नम्रता एक किस्सा सांगत म्हणाली, “एक प्रसंग असा घडला होता की माझे पप्पा जेव्हा परदेशात होते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी जॉब शोधला होता. सव्वा लाख पगार होता. व्हिसा आला. मला माहित नाही का, पण मला असं वाटलं की पप्पा मला एवढ्या लांब एकटीला जायचं नाही. तेव्हा मी लहानही होते. नुकतीच मी कॉलेजमधून पासआऊट झाले होते. माझे पप्पा माझ्यावर खूप चिडले होते. रागवले होते,बोलत नव्हते. तू हे चुकीचं केल. मी तुझ्यासाठी ते ओळख काढून प्रयत्न केले असं ते म्हणाले. पण पुढच्या एका महिन्यात मला ‘छत्रीवाली’ या मालिकेत काम मिळालं.”

“माझ्यासाठी मी जे निर्णय घेतले ते चुकीचे ठरले…”

आयुष्यात चांगल्या-वाईट घडणाऱ्या गोष्टींकडे ती कशी बघते याबद्दल ती म्हणाली, “मला असं वाटतं की माझ्यासाठी मी जे निर्णय घेतले ते चुकीचे ठरले नाहीत. मला पश्चात्ताप नाही, कोणाबद्दल राग नाही. उलट ज्या कोणाबरोबर माझे जे राग रुसवे फुगवे असतील, काही नाती तुटली असतील. मला आजही त्यांच्याबद्दल असं वाटतं त्यांनी काहीतरी केलं म्हणून मी चांगलं बघून इथपर्यंत पोहोचू शकले. कारण तिथूनच आपल्याला ताकद मिळते.”

ती असेही म्हणाली, “जर आपण या गोष्टींकडे सकारात्मकतेने बघितलं नाही, तर नकारात्मक गोष्टी घेऊन आपण किती लोकांना कोसत बसणार., आयुष्याला किती कोसत बसणार. मी संघर्ष केला नाही, मी शिकले. मी शिकत शिकत इथपर्यंत आले. मी शिकले म्हणून मी आज इथं बसली आहे. मला कुठल्याच गोष्टींचा पश्चात्ताप नाहीये. जे काय झालं ते छान झालं आणि होणं गरजेचं होतं. कारण मी लहानपणापासून ज्या स्वभावाची होते, खूप शांत, घाबरट, मला प्रत्येक वेळी कोणाचा तरी पाठिंबा लागायचा. पण आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे मी तशी राहिले नाही. आज मी एकटी सगळीकडे फिरते, एकटी राहते. मी एकटी काम करते, मी माझ्या स्वतःसाठी एकटीने गोष्टी करते. मला आज कोणाचीच गरज नाहीये. आई-वडील हे वर्ष-वर्ष माझ्याबरोबर नसतात. मी घरी जाते तेव्हा आम्ही बोलतो, भेटतो मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करते. कोणी मला सांगायची गरज भासत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही झालं ते छान झालं.”