टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल हुसैन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती फोटो, व्हिडीओ आणि व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
छवीने १२ दिवसांपूर्वी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओच्या थंबनेलमध्ये ती तिच्या मुलाला किस करताना दिसली होती. पण काही जणांनी तिला मुलाला ओठांवर किस घेतल्याने ट्रोल केलं. आता छवीन त्या कमेंटचा स्क्रीनशॉट टाकत पोस्ट शेअर करून उत्तर दिलं आहे.
छवी मित्तलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पहिला फोटो एका कमेंटचा आहे. त्यात आपण थंबनेल फोटो डिसलाइक केल्याचं म्हटलं होतं. मुलांना अशा प्रकारे किस करू नये, आपल्याला हे मुलांचं शोषण वाटत असल्याचंही युजरने लिहिलं होतं. नंतर तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती मुलगा अरहम हुसैन याला लिप किस करताना दिसत आहे. यानंतर, तिने पुन्हा कमेंट सेक्शनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. नंतर एका फोटोत ती मुलगी अरीजाला किस करताना दिसत आहे.
छवीने हे फोटो पोस्ट करत “एक आई आपल्या मुलांवर प्रेम करते, यावर काही लोकांचा आक्षेप असू शकतो यावर मला विश्वास बसत नाहीये. या ट्रोलच्या कमेंटला माझ्या समर्थनार्थ आलेल्या कमेंट्स केवळ माझ्या समर्थनात नाहीत, त्या मानवतेच्या समर्थनार्थ आहेत. प्रेम. अथांग प्रेम. माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर करत आहे, कारण त्यांच्यावरील माझ्या प्रेमाची सीमा कशी ठरवायची हे मला कळत नाही. मी त्यांना प्रेम व्यक्त करण्याबद्दल निःसंकोच राहण्यास शिकवते आणि ते तसं करतात. मी त्यांना फक्त एकच गोष्टीपासून दूर राहण्यास शिकवते, ते म्हणजे लोकांना त्रास देणे. एक पालक म्हणून तुमची प्रेमाची भाषा काय आहे? हे कमेंट्समधून मला जाणून घ्यायला आवडेल,” असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, छवीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. अशा कमेंट करणाऱ्यांचा मेंदू सडका असतो, त्यांच्या डोक्यात सतत तसेच विचार असल्याने ते अशा कमेंट्स करतात, अशा प्रतिक्रिया तिच्या या पोस्टवर लोकांनी दिल्या आहेत.