Sairaj Kendre Dance Video : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे चिमुकला साईराज केंद्रे रातोरात प्रसिद्धीझोतात आला अन् महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. यानंतर या बालकलाकाराने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत ‘सिम्बा’ची भूमिका साकारली. सध्या हा चिमुकला ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीच्या मुलाची म्हणजेच अबीरची भूमिका साकारतोय. त्याच्या अभिनयाचं नेहमीच सर्वत्र कौतुक केलं जातं. पण, साईराज उत्तम डान्सर सुद्धा आहे.

साईराज लहान असल्याने त्याचं सोशल मीडिया अकाऊंट त्याचे आई-वडील सांभाळतात. साईराजचे भन्नाट डान्स व्हिडीओ ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. कधी गोविंदाच्या जुन्या सुपरहिट गाण्यांवर, तर कधी सध्याच्या ट्रेंडिंग गाण्यांवर साईराज ठेका धरताना दिसतो. साईराजने नुकताच दादा कोंडकेंसारखा लूक करून “हिल हिल पोरी हिला…” या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

दादा कोंडके यांचं “हिल हिल पोरी हिला…” हे सदाबहार गाणं आता नव्या व्हर्जनमध्ये रिक्रिएट करण्यात आलं आहे. ५२ वर्षांपूर्वीच्या या सुपरहिट गाण्याचं एक नवीन व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. याच गाण्यावर साईराजने ठेका धरला आहे.

साईराजच्या डान्ससह त्याच्या कमाल एक्स्प्रेशन्सचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं आहे. “साईराज किती गोड”, “एकदम छान…दादा कोंडके यांचा लूकही छान दिसतोय”, “एक नंबर साईराज”, “साईराज फायर डान्स”, “हा मुलगा किती हुशार आहे”, “आमचा लाडका सिम्बा”, “एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”, “किती गोड दिसतोय अबीर” अशा प्रतिक्रिया त्याच्या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, मराठी सिनेविश्वात सुपरहिट ठरलेल्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमात सुद्धा साईराज झळकला आहे. त्याने अमेय वाघच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. सध्या तो ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या मुलाची म्हणजेच अबीरची भूमिका साकारतोय. ‘झी मराठी’वर ही मालिका आता दुपारच्या सत्रात १ वाजता प्रसारित केली जाते.