Sairaj Kendre Dance Video : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे चिमुकला साईराज घराघरांत पोहोचला. त्याचा Reel व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला अन् रातोरात साईराजला लोकप्रियता मिळाली. यानंतर या चिमुकल्या बालकलाकाराला ‘झी मराठी’च्या मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने साकारलेला ‘सिम्बा’ आजही सर्वांच्या लक्षात आहे. याशिवाय मराठी सिनेविश्वात सुपरहिट ठरलेल्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमात सुद्धा साईराजने अमेय वाघच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. सध्या हा चिमुकला ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीच्या मुलाची म्हणजेच अबीरची भूमिका साकारतोय.

साईराजच्या अभिनयाची सर्वत्र कायमच चर्चा होत असते. पण, याच जोडीला हा चिमुकला सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. साईराज लहान असल्याने त्याचं सोशल मीडिया अकाऊंट त्याचे आई-वडील सांभाळतात. साईराजचे भन्नाट डान्स व्हिडीओ ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

साईराजने नुकताच गोविंदाच्या एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला. गोविंदासारख्या हुकस्टेप्स आणि तशाचप्रकारचे एक्स्प्रेशन्स साईराजने या व्हिडीओमध्ये दिले आहेत. त्याचा डान्स अन् एक्स्प्रेशन्स पाहून चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. साईराज गोविंदाच्या २८ वर्षांपूर्वीच्या “किसी डिस्को में जाए” या गाण्यावर थिरकला आहे. हे गाणं १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटातलं आहे.

गोविंदाची ही सदाबहार गाणी सोशल मीडियावर कायम ट्रेंडिंग असतात. साईराजचा डान्स पाहून नेटकरी म्हणतात, “एक नंबर साई…काय हावभाव आहेत सेम टू सेम गोविंदा”, “सुपर साई…आमचा साई लवकरच बॉलीवूडमध्येही नाव गाजवणार”, “आमचा सिम्बा आणि अबीर…सुंदर डान्स”, “फायर डान्स”, “बाळा तुला सगळंच जमतं…कमाल आहे”, “जबरदस्त डान्स” अशा असंख्य कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, साईराज महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेली ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ‘झी मराठी’वर दुपारच्या सत्रात १ वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत त्याच्यासह प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, बालकलाकार वेदांती भोसले, पूर्वा शिंदे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.