Sairaj Kendre Dance Video : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे घराघरांत लोकप्रिय झाला. नुकताच तो ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सिनेमात सुद्धा झळकला होता. साईराज आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. त्याच्या क्युट अन् निरागस एक्स्प्रेशन्सनी तो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतो. या चिमुकल्या साईराजचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साईराज केंद्रेचं इन्स्टाग्राम अकाऊंट त्याचे पालक सांभाळतात. त्यांनी चिमुकल्या साईराजचा ‘लाल बांगडी’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला अल्पावधीतच १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

साईराजने संजू राठोडच्या सर्वत्र ट्रेंड होणाऱ्या “लाल-लाल कलरची बांगडी…” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्स व्हिडीओमध्ये साईराजचे हावभाव, त्याचा जबरदस्त डान्स, त्याची एनर्जी या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत साईराजचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर स्वत: संजू राठोडने सुद्धा या व्हिडीओवर “भारी…” अशी कमेंट केली आहे.

साईराज केंद्रे सध्या ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारत आहे. या मालिकेत लीप आला असून साईराज हा सावलीच्या ऑनस्क्रीन मुलाची म्हणजेच अबीरची भूमिका साकारतोय. यापूर्वी या चिमुकल्याने ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ती साईराजची पहिलीच मालिका होती.

दरम्यान, “लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल” असे या ‘Bangles’ गाण्याचे बोल आहेत. संजू राठोडने स्वत: हे गाणं लिहिलं असून, त्यानेच कंपोझ सुद्धा केलं आहे. यासह या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात संजूसह ‘बिग बॉस’ फेम लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. यापूर्वी ती संजूच्या ‘शेकी’ गाण्यात देखील झळकली होती. आता सध्या संजूच्या ‘लाल बांगडी’ ( Bangles ) या गाण्याने संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.