Sairaj Kendre Dance Video : लोकप्रिय बालकलाकार साईराज केंद्रे सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. लहान वयातही त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या व्हायरल रील व्हिडीओमुळे साईराज रातोरात महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला होता. यानंतर या चिमुकल्याला ‘झी मराठी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यावेळी साईराजने सर्वांची मनं जिंकून घेतली. आताही ‘सावळ्याची जणू सावली’मधील क्युट अबीर सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

साईराज उत्तम बालकलाकार आहेच…पण, याच सोबतीला त्याला डान्सची सुद्धा प्रचंड आवड आहे. साईराजचं सोशल मीडिया अकाऊंट त्याचे आई-बाबा हँडल करतात. त्याचे असंख्य डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. नुकताच साईराजने शाहरुख खानच्या सदाबहार गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

साईराज केंद्रेने शाहरुख खानच्या “कोई लडकी है…चक धूम धूम, चक धूम धूम” या २९ वर्षे जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणं ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील असून यामध्ये शाहरुखसह माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे या सिनेमात शाहरुखने त्याच्या कोरिओग्राफरच्या ( राहुल ) भूमिकेला शोभेल असा लूक केला होता. त्याच्यासारखी हुबेहूब ड्रेसिंग करण्याचा प्रयत्न साईराजने सुद्धा केला आहे.

साईराजच्या सुरुवातीच्या डान्स स्टेप्स, त्याचे एक्स्प्रेशन्स या सगळ्याचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साईराजच्या व्हिडीओवर ‘Cutie’ अशी कमेंट केली आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी “आमचा हिरो आहे साईराज”, “वॉव डान्स, किती गोड बाळ आहे”, “अरे बाळा पावसात नको डान्स करू…तुझ्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे”, “भविष्यात साईराज नक्कीच एक चांगला कलाकार होणार”, “माय स्टार Keep शायनिंग” अशा प्रतिक्रिया देत साईराजचं भरभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, साईराज केंद्रेबद्दल सांगायचं झालं तर, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत तो चिमुकल्या अबीरची भूमिका साकारतोय. यंदाच्या वर्षी साईराज ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सुपरहिट सिनेमात सुद्धा अमेय वाघच्या ऑनस्क्रीन लेकाच्या भूमिकेत झळकला होता.