Did Onkar Bhojane have to struggle after coming to Mumbai: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ओंकार भोजनेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याने काही सिनेमांतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ओंकार भोजनेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा होता, तसेच मुंबईत आल्यानंतर त्याला संघर्ष करावा लागला का याबद्दल वक्तव्य केले आहे.
ओंकार भोजनेला मुंबईत आल्यानंतर कामासाठी संघर्ष करावा लागला का?
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये ओंकार भोजनेने हजेरी लावली होती. यावेळी त्याला विचारले की तू चिपळूणचा आहेस, तिथे कमी लोकांमध्ये काम करावं लागतं, आपलीच माणसं असतात; तर मुंबईसारख्या महासागरात आल्यानंतर संघर्ष करावा लागला का? यावर ओंकार भोजने म्हणाला, “संघर्ष तसा काही नव्हता. कारण-माझा मित्रपरिवार मुंबईत होता. एकांकिका स्पर्धांवेळी छान मित्र झाले होते. युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा करताना आम्हाला तिथे सोय असायची. पण, बाकी कोणत्या स्पर्धा असतील तर कॉलेज आमची व्यवस्था करायचे. शिवाय मी माझ्या एकट्याच्या कामासाठी आलो असेन तर मित्रांकडे राहायचो. मित्रपरिवार चांगला असल्यामुळे सोपं गेलं, संघर्ष तसा करावा लागला नाही.”
पुढे त्याला विचारले की, तू या सगळ्यात तुझं वेगळेपण कसं टिकवलंस? आता तुला जितकी लोकप्रियता मिळाली आहे, त्यासाठी ऊर्जेने काम करावं लागतं. एक अभिनेता म्हणून स्वत:ला कसं घडवलंस? यावर ओंकार म्हणाला, “हे फक्त माझ्यावर अवलंबून नाही. मी ज्यांच्याबरोबर किंवा ज्या टीमबरोबर काम करतो, त्यांच्यावरही अवलंबून आहे. आज मी एका मोठ्या मंचाचा भाग आहे.”
तो असेही म्हणाला, “कुठलंही स्कीट आल्यानंतर मला एकदा वाचून लक्षात येत नाही. मला वाचून वाचून लक्षात येतं आणि जेव्हा परफॉर्मन्स असतो, तेव्हा एक कोणीतरी माझा आधार असतोच, जो ठरलेला असतो. गौरव होता, त्याला कळायचं की मी आता थांबलोय. आता पृथ्वीक प्रताप, प्रथमेश शिवलकर, वनिता असे सगळेच आहेत. त्यांना कळतं; तर त्या वातावरणामुळे मी ते करू शकलो.”
कामाच्या स्लो पद्धतीचा कधी तोटा झाला का? यावर ओंकार म्हणाला, “आपण कोकणातील म्हणून सुशेगात. म्हणजे खूप काही मिळवण्यासाठी धडपड नाही करायची. जे आहे ते व्यवस्थित जपून करायचं. कारण तेवढा वेळ तर असतो, म्हणजे मला उद्या शूटिंग असेल तर मला आज स्कीटसाठी एक दिवस मिळतो तर तेवढा वेळ पुरेसा असतो; तर त्या पूर्ण दिवसाचा शक्य तितका जास्तीत जास्त वापर करायचा.”
