Choreographer Geeta Kapur relationship status Single at 52 : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर व ‘गीता माँ’ म्हणून घराघरात ओळखल्या जाणाऱ्या गीता कपूर या नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत असतात. अनेक सुपरहिट गाण्यांना नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या गीताने रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ५२ वर्षांच्या गीता कपूर यांनी अद्याप लग्न केलेले नसल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. त्यांच्या लग्नाबाबतच्या अफवा अनेकदा समोर आल्या; मात्र त्यांनी त्यावर नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली. दरम्यान, आयुष्यातील जोडीदाराकडून प्रपोज कसे करावे, याबद्दल गीता कपूर यांनी नुकताच एक खुलासा केला आहे.

फिल्मीज्ञान या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरिओग्राफर गीता कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितले आहे. लव्ह लाईफबद्दल सांगताना गीता यांना कोणत्या पद्धतीने प्रपोज केलेले आवडेल याबद्दल विचारण्यात आले. डान्सर गीता कपूर यांना कोणते नृत्य करून प्रपोज केले पाहिजे का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, अजिबात नाही. मला प्रपोज करण्याची कोणती खास अशी पद्धत नाहीये; पण कोणीच मला डान्स करून प्रपोज करू नये. कारण- मी कधीच त्याने इम्प्रेस होणार नाही, अशी प्रतिक्रिया गीता कपूर यांनी दिली आहे.

अशा अफवा पसरणे हे बंद केले पाहिजे – गीता

सोशल मीडियावर अनेकदा गीता कपूर यांनी लग्न केल्याच्या अफवा उडाल्या आहेत. त्यांचे सिंदूर लावलेले फोटोदेखील व्हायरल झाले होते. मात्र, हे फक्त एका शूटिंगपुरते असल्याचे गीता यांनी स्पष्ट केले होते. लग्नाबद्दल मत व्यक्त करताना गीता कपूर म्हणाल्या की, मी लग्न केले आहे, अशी अफवा अनेकदा पसरली आहे. मी गुपचूप लग्न केले, असे म्हटले जाते; पण हे पूर्णपणे खोटे आहे. जर मी विवाहित असते, तर मी अभिमानाने सांगितले असते, ‘हो, मी लग्न केले आहे आणि मला मुले आहेत. पण या अशा अफवा पसरणे हे बंद केले पाहिजे, असे मत गीता कपूर यांनी व्यक्त केले आहे.

गीता कपूर यांच्या प्रॉपर्टीवरुन अफवा

सोशल मीडियावर गीता कपूर यांची करोडो रुपयांची संपत्ती असल्याचा दावा केला जातो. त्यावर प्रतिक्रिया देताना गीता कपूर म्हणाल्या की, अनेक वेळा मी वाचले आहे की, माझी करोडोंची प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते. तेव्हा मलाच हा प्रश्न पडतो की, कुठे आहे ही संपत्ती, जी मला माहीतसुद्धा नाही. मला त्या आलिशान बंगल्यामध्ये राहायचे आहे आणि करोडोंच्या गाडीमधून फिरायचे आहे. बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये असल्याचे सांगितले जाते; पण कुठे आहेत ते पैसे, मला खर्च करायचे आहेत, अशी मिश्कील टिप्पणी गीता कपूर यांनी केली.

पुढे त्या म्हणाल्या की, चित्रपटसृष्टीशी निगडित काम करीत असल्यामुळे अशा अफवा पसरवल्या जातात; पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या अफवांबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटते. सरकारला आमच्या सर्व मालमत्तेबद्दल माहीत आहे आणि आम्ही त्यावर कर भरतो.