CID 2: सीआयडी हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. सीआयडीच्या पहिल्या सीझनला जितका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तितकाच तो दुसऱ्या सीझनलादेखील मिळताना दिसत आहेत.
१९९८ साली सीआयडी हा शो सुरू झाला. २०१८ पर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र, हा शो संपल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना दु:ख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. या मालिकेतील पात्रे लोकप्रिय ठरली होती. शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, हृषिकेश पांडे, जान्हवी छेडा, श्रद्धा मुसळे, आदित्य श्रीवास्तव, नरेंद्र गुप्ता आणि मालिकेतील इतर कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
सीआयडीमधील एसीपी प्रद्यु्म्न, दया, अभिजीत, श्रेया, पूर्वी, पंकज, सचिन अशी पात्रे प्रेक्षकांची लाडकी ठरली होती. यामध्ये श्रेया व दया यांच्या जोडीचा चाहतावर्गदेखील निर्माण झाला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोड मध्ये श्रेयाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. ती तिच्या लहान मुलीसह दिसली. तिला व तिच्या मुलीला पाहून सीआयडीची संपूर्ण टीम भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
अभिनेत्रीने जान्हवी छेडाने सीआयडीमध्ये श्रेया ही भूमिका साकारली आहे. आता सीआयडी २ मध्ये इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला. मात्र, ती काही सेंकदासाठीच एपिसोडमध्ये दिसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. निर्माते तिचा वापर टीआरपीसाठी करत असल्याचे त्यांनी म्हटले.
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने लिहिले, “शनिवारचा एपिसोड खूपच आवडला. पण रविवारचा एपिसोड पाहून अपेक्षाभंग झाला. श्रेयाच्या पुनरागमनाची इतके दिवस वाट पाहिल्यानंतर ती फक्त ३० सेंकदच स्क्रीनवर दिसली. निर्माते फक्त तिचा टीआरपीसाठी वापर करत असल्यासारखे वाटत आहे. ” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “माझ्यातली १७ वर्षीय मुलगी रडत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तिच्या एन्ट्रीने खूप आठवणी जाग्या झाल्या”, “मी खूप भावुक झालो”, “तिला ऑफिसर म्हणून परत आणा”, “आम्हाला श्रेया कायमची सीआयडीमध्ये पाहिजे”, “मला सीआयडीमध्ये हेच बघायचे होते”, अशा अनेक कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.





आता जान्हवीच्या एन्ट्रीनंतर अभिनेत्री श्रद्धा मुसळेची एन्ट्रीदेखील व्हावी अशी इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. डॉक्टर सांळुखेंच्या एक्झिटनंतर डॉक्टर तारिकाची मालिकेत एन्ट्री होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.